मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (22:26 IST)

राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदार संघाच्या संदर्भात’ विधिमंडळ सदस्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय -प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत मंगळवार, दि. 5 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 12.30 ते 5.30 वा. तसेच बुधवार, दि. 6 ऑक्टोबर, 2021 रोजी सकाळी 11.00 ते 1.30 या वेळेत मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे ‘राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदार संघाच्या संदर्भात…’ या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते तसेच उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्यमंत्री अॅड.अनिल परब, विधानपरिषद विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस  वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई, संसदीय कार्य राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
 
अर्थसंकल्प आणि त्यातील आकडेवारी समजणे क्लिष्ट, गुंतागुंतीचे असते. अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत सन्माननीय सदस्यांचा सहभाग वाढावा, अर्थसंकल्पातील तरतुदी आणि त्यांच्या मतदार संघातील विकास योजना यांचा सुयोग्य मेळ साधता यावा, यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेची आखणी व विषयांची निवड करण्यात आली आहे.
 
या कार्यशाळेस वक्ते म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, संसदीय कार्यमंत्री अॅड.अनिल परब तसेच दोन दिवसीय व्याख्यानाच्या दोन सत्रांचे अध्यक्ष म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि विधानसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
 
या दोन दिवसीय कार्यशाळेत अ) अर्थसंकल्पाची प्रक्रिया ब) अर्थसंकल्पीय प्रकाशने समजावून घेताना (उदाहरणार्थ आर्थिक पाहणी अहवाल… राज्याच्या प्रगतीचे प्रतिबिंब) क) अर्थसंकल्पावरील चर्चेत सन्माननीय सदस्यांचा सहभाग ड) विधिमंडळ सदस्यांचा स्थानिक विकास निधी व त्याचा सुनियोजित वापर इ) अर्थसंकल्पातून होणारी विकासकामे, त्यांचे नियोजन आणि पाठपुरावा या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक व्याख्यानानंतर सदस्य यांना प्रश्नोत्तरासाठी वेळ राखून ठेवण्यात आला आहे.
 
कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे मानद सल्लागार हेमंत टकले, महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत आणि वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांनी केले आहे.