शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 एप्रिल 2021 (08:25 IST)

अन्य राज्यातून सुमारे ५०० मॅट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करा

राज्यात सध्या १ हजार २५० मॅट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित होत असून परराज्यातून सुमारे ३०० मॅट्रिक ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. सध्याची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यातून सुमारे ५०० मॅट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी येथे दिली.
 
आजच्या घडीला राज्यात ६ लाख ८५ हजार सक्रीय रुग्ण आहेत. त्यातील सुमारे १० ते १५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू शकते असा अंदाज आहे. सध्या १ हजार २५० मॅट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित होत असून तो पूर्णपणे वैद्यकीय कराणासाठी वापरला जातो. त्याशिवाय जामनगर, भिलाई आणि भिल्लारी येथून सुमारे ३०० मॅट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यात अजून वाढ करण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे.
 
राज्यात एकूण १ हजार ५५० मॅट्रिक टन ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभाग तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली त्याचे वाटप केले जात आहे. केंद्र सरकार सुमारे ५० हजार मॅट्रिक टन ऑक्सिजन आयात करणार असून त्यामाध्यमातूनही राज्याला ऑक्सिजन मिळण्याची शक्यता टोपे यांनी वर्तवली.
 
पेण (जेएसडब्ल्यू), थळ (आरसीएफ), वर्धा (लॉइड स्टील), औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले खापरखेडा, पारस, परळी अशा सहा ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होत असून त्याची शुद्धता ९८ टक्के आहे. हा ऑक्सिजन रुग्णाला देता येऊ शकतो. त्यामुळे या सहा ठिकाणी प्रत्येकी ५०० खाटांचे रुग्णालय निर्माण करून रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे नियोजन आहे. त्याची निर्मिती झाल्यावर राज्यात तीन हजार खाटांची भर पडणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.