गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जानेवारी 2022 (13:15 IST)

नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयानं दिलं अटकेपासून 10 दिवसांचं संरक्षण

संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले आहे.
 
एएनआय या वृत्तसंस्थेनं ट्विट करत म्हटलंय की, "सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राचे भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले आहे.
 
"सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या महिन्यात दाखल झालेल्या प्रकरणात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ट्रायल कोर्टासमोर शरण जाण्याचे आणि नियमित जामीन घेण्याचे निर्देश त्यांना दिले आहेत."
 
याआधी मुंबई उच्च न्यायालयानं नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीण अर्ज फेटाळला होता.
 
त्यावेळी संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे मुख्य आरोपी असल्याची माहिती राज्य सरकारने कोर्टाला दिली होती. तर माझ्यावर दाखल गुन्हा राजकीय षड़यंत्राचा भाग असल्याचा आरोप नितेश राणे यांनी कोर्टात केला होता.
 
काय आहे प्रकरण?
संतोष परब हे सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातले शिवसैनिक आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख होते.
 
18 डिसेंबरला दुचाकीवरून जात असताना आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता.
 
एका गाडीनं आपल्याला आधी धडक मारली, त्यानंतर गाडीतून उतरलेल्या व्यक्तीनं चाकूनं हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोराने नीतेश राणेंना कळवायला पाहिजे, असा उल्लेख केल्याचं संतोष परब यांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
 
याप्रकरणी पोलीसांनी मुख्य आरोपी सचिन सातपुतेसह चार जणांना अटक केली. त्यानंतर नितेश राणे यांचीही पोलीसांनी चौकशी केली. पण नितेश यांनी आपल्यावरचे आरोप साफ नाकारले होते.