रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (08:48 IST)

नाणारसंदर्भात बातमी शेअर करणाऱ्या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू

death
राजापूर येथे झालेल्या थार आणि दुचाकी अपघातात जखमी झालेले 'महानगरी टाइम्स'चे पत्रकार शशिकांत वारीसे यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.
 
थार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर राजापूर पोलीस स्थानकात 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात मृत झालेल्या शशिकांत वारीसेंच्या नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
 
सोमवारी सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारीसे यांनी रिफायनरी ग्रुपमध्ये एका बातमीची पोस्ट केली होती.
 
'मोदीजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो' अशा आशयाच्या बातमीचे कात्रण वारीसे यांनी सकाळी टाकले होते. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या बॅनर संदर्भात ही बातमी होती. पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्ष आहेत.
 
वारीसे यांच्या नातेवाइकांनी केलेल्या आरोपावरून कार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 
यानंतर दुपारी 1.15 च्या दरम्यान राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या महिंद्रा थार गाडीने पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत वारीसे गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. मात्र, आज सकाळी त्यांचे निधन झाले.
 
मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने देखील या प्रकाराची चौकशी करून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
Published By -Smita Joshi