शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (16:33 IST)

ताईसाहेब, पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांचे बंधू आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांच्या या पत्रावरुन धनंजय मुंडे यांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे.
 
“ताईसाहेब, मुख्यमंत्र्यांना व आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल,” असा टोला धनंजय मुंडे यांनी ट्विट करत लगावला आहे.
 
दरम्यान यावेळी त्यांनी जिल्ह्यातील लसीकरणाची माहिती देताना सांगितलं की, “जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून १४९४७३ नागरीकांना पहिले तर १९७३२ नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत. हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको”.
 
“बीड जिल्ह्यात सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे १३२९० डोस शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावं. पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो,” अशी उपहासात्मक टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.