बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 16 जानेवारी 2020 (17:29 IST)

'तान्हाजी' महाराष्ट्रात करमुक्त ; कॅबिनेटमध्ये एकमत

'तान्हाजी द अनसंग वॉरियर' चित्रपट महाराष्ट्रातही करमुक्त होणार आहे. 'तान्हाजी' करमुक्त करण्यासंदर्भात आजच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाले. मुख्यमंत्री लवकरच त्याबाबत घोषणा करतील, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
 
करमणूक कर आता जीएसटीच्या अखत्यारीत येत असल्याने राज्य सरकार एसजीएसटीचा परतावा देणार
आहे, असे थोरात यांनी पुढे नमूद केले. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांनी 'तान्हाजी' चित्रपट आधीच करमुक्त केला आहे.
 
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात मला पत्र लिहून महाराष्ट्रातील चित्रपट रसिक आणि शिवप्रेमींची 'तान्हाजी' चित्रपट करमुक्त करावा, ही भूमिका आग्रहाने मांडली होती. या मागणीचा विचार करून 'तान्हाजी' चित्रपट करमुक्त करण्याचा विचार मंत्रिमंडळाने केला व त्यावर सर्वांचेच एकमत झाले, अशी माहिती थोरात यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 
 
फडणवीस यांनीही केली होती मागणी
 
स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्या तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित 'तान्हाजी' हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पत्रातून केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अधिकाधिक शिवभक्त आणि मराठीजनांर्पंत हा चित्रपट पोहोचणे आणि या ऐतिहासिक स्मृतींचे जतन होणे अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच त्यांच्या शौर्याचे स्मरण होण्यासाठी हा चित्रपट महाराष्ट्रात करमुकत करावा, अशी विनंती फडणवीस यांनी आपल्या पत्रात केली होती.