रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (08:52 IST)

राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान

राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. कोरोनाच्या सावटाखाली ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अशा परिस्थितीतही प्रशासनाच्यावतीने सगळी तयारी पूर्ण झाली आहे. मतदारांनी मतदान करताना काय काळजी घ्यायची आहे आणि मतदान कशा पद्धतीने करायचं आहे तसंच प्रशासनाची तयारी कुठपर्यंत झाली आहे याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. 
 
“कोरोनामुळे मतदान केंद्रावर आधीच तयारी करून ठेवण्यात आली आहे. मतदार मतदान केंद्रावर येताच त्यांचं तापमान मोजण्यात येईल. त्याला ताप आहे का हे बघण्यात येईल. मास्क घातलं नसल्यास त्याला मास्क देण्यात येईल. सॅनिटायझर, ग्लोज मतदान केंद्रावर ठेवण्यात आले आहे”, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
 
“मतदारांनी सोबत पेन आणि मोबाईल आणू नये. आणल्यास तो बाहेर ठेवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या पेननेच मतदान करायचं आहे. मतदान करताना इंग्रजी मराठी आणि रोमन भाषेत आकडे लिहिता येणार आहे”, असंही त्यांनी सांगितलं.
 
पदवीधर मतदारसंघासाठी नागपुरात 165 मतदान केंद्र आहेत. 38 झोनल ऑफिसर असून ते संपूर्ण मतदान सामग्री घेऊन पोलीस पथकासह रवाना झाले आहेत. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरवात होणार आहे तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान चालणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.