राज्यात भाजपचे ५० लाख नवीन सदस्य करण्याचे उद्दिष्ट
देशभरात सर्वस्पर्शी भाजप, सर्वव्यापी भाजप या संकल्पासह ६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत नवीन सदस्य नोंदणीसाठी मोहीम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील ९५ हजार ४०० बूथवर प्रत्येकी ५० अशा रितीने भाजपचे ५० लाख नवीन सदस्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती सदस्यता नोंदणी अभियानाचे राष्ट्रीय प्रमुख शिवराजसिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशभरात भाजपचे ११ कोटी तर महाराष्ट्रात एक कोटी सदस्य आहेत. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ६ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सदस्यता नोंदणीला सुरुवात होईल. महाराष्ट्रात ९५ हजार ४०० बूथ आहेत. प्रत्येक बूथवर ५० नवीन सदस्य नोंदणीचे लक्ष्य ठरवण्यात आले असून त्यामुळे राज्यात भाजपचे ५० लाख नवीन सदस्य होतील. चार ते पाच बूथ मिळून एक अशा रीतीने राज्यात २० हजार शक्तीकेंद्रे आहेत. या शक्तीकेंद्रातील विस्तारकांना ६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत केवळ नवीन सदस्य नोंदणीचे काम करण्यास सांगण्यात येणार आहे, असे चौहान यांनी सांगितले.