नागरी वसाहतीत संशयास्पद अवस्थेत आढळला बिबट्याचा मृतदेह
आडगाव शिवारातल्या स्मशानभूमीजवळ मंगळवारी सकाळी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. काही नागरिकांना मृतावस्थेत पडलेला बिबट्या दिसल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सदरच्या बिबट्याच्या अंगावरचे कातडे काढण्याचा प्रयत्न केला असून बिबट्याला कोणीतरी अन्य ठिकाणी मारून आडगाव शिवारात आणून टाकल्याची शक्यता पोलीस व्यक्त केली आहे. दुसरीकडे वन्यजीव प्रेमी संस्थांनी देखील घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मृतदेहावर कोठे ही जखम नसून केवळ पाठीवरून काही प्रमाणात कातडी गायब झाल्याचे दिसते. त्यामुळे अंधश्रद्धेपोटी बिबट्याचा बळी दिला असावा अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. आता शवविच्छेदनानंतर बिबट्याच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.