गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (22:58 IST)

राज्यभरात ठिकठिकाणी पूरस्थिती, मुख्यमंत्र्यांनी केली गडचिरोलीत हवाई पाहणी

flood
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती ओढवल्याचं चित्र आहे.विशेषत: विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झालीय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत जाऊन या भागाची हवाई पाहणी केली.
 
या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, "गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह नागपुरात आलो असता, विभागीय आयुक्तांकडून पूर्व विदर्भातील स्थितीची माहिती घेतली, नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर गडचिरोलीकडे प्रयाण केले."
 
उत्तर महाराष्ट्रातही पावसानं धुमाकूळ घातला आहे.
 
नाशिकमध्ये पुढील 4 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, नाशिकमधील एकूण सहा धरणांमधून 50 हजार क्युसेक्सनं जायकवाडीकडे विसर्ग सुरू आहे.
 
नाशिक शहरात संपूर्ण रामकुंड परिसर पाण्याखाली आहे, तर संपूर्ण जिल्ह्यात यंत्रणा सतर्क झाल्या असून 7 छोटे पूल पाण्याखाली तर 12 गावांचा संपर्क तुटला आहे.
 
पैनगंगा दुथडी भरून वाहतेय...
नांदेड, हिंगोली जिल्ह्यात सातत्याने बरसत असलेल्या पावसाने पैनगंगा नदी काठोकाठ भरून वाहतेय. त्यातूनच पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड इथे असलेल्या धबधब्याचे अक्राळविक्राळ स्वरूप यंदाच्या मौसमात पहिल्यांदाच दिसतंय.
 
एरव्ही पावसाळ्यात एखाद्या दिवशीच धबधब्याचे असे दुर्मिळ दृश्य पहायला मिळत असते. कालपासून संततधार पावसाने सहस्त्रकुंड धबधबा आता अक्राळविक्राळ बनलाय.
 
नेमकं सुट्टीच्या दिवशी धबधब्याला नयनरम्य स्वरूप आल्याने पर्यटकांची इथे गर्दी होताना दिसतेय.
 
नंदुरबारमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस
नंदुरबार जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावत जोरदार सुरवात केली आहे.
 
अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी येथील आश्रमशाळेत नदीचे पाणी घुसले असून अनेक विद्यार्थ्यांना दोरीच्या साहाय्याने पाण्यातून काढत दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले आहे.
 
नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी येथे जोरदार पावसामुळे देव नदी ओसंडून वाहत असून या नदीचे पाणी गावात आणि वडफडी या गावातील आश्रम शाळेत शिरले शाळा परिसर तसेच गाव परिसरातही नदीचे पाणी आल्याने सर्वत्र जलमय स्थिती पाहायला मिळत आहे.
 
आश्रम शाळा परिसरात जास्त प्रमाणात पाणी घुसल्याने तेथील विद्यार्थ्यांना तात्काळ दोरीच्या साहाय्याने पाण्यातून काढत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत हलवण्यात आले तर काही विद्यार्थी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर थांबले आहेत.
 
नंदुराबरमधील धाडगाव आणि अक्कलकुवा तालुका हे अति दुर्गम डोंगराळ भाग असून या भागात पावसाळ्यात पायाभूत सोयी सुविधांची कमतरता अधिक तीव्रपणे लक्षात येते.