उच्चदाब विजेच्या टॉवरखाली अडकून तरुणाचा मृत्यू, तपासात धक्कादायक माहिती उघड
शेतातून जाणाऱ्या विजेच्या टॉवरचा भाग कोसळून त्या खाली दबल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली. ही घटना जामखेड तालुक्यातील चुंबळी गावात शुक्रवारी घडली. आनंद प्रभाकर हुलगुंडे (वय-25) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.आनंद याच्या मृत्यू झाल्यानंतर तो रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी कशासाठी गेला होता.हे समजू शकले नाही.तर शेतात टॉवर उभारण्यासाठी या शेतकऱ्याने विरोध केला होता.शेतात उभारण्यात आलेले टॉवर पाडण्यासाठी तो रात्री शेतात गेल्याचा दावा महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
जामखेड पासून पाच किमी असलेल्या चुंबळी येथील शिवारातून महापारेषण कंपनीची टॉवर लाईन गेली आहे.आष्टी आणि खर्डा अशा दोन वीज केंद्राला ही लाईन जोडली आहे.चुंबळी येथे आनंदच्या शेतातून ही लाईन गेली आहे. या बदल्यात त्याला नुकसान भरपाई मिळाली आहे.परंतु कराराप्रमाणे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आनंदचा या टॉवरला विरोध होता.असं ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या घटनेसंदर्भात महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेगळाच दावा केला आहे.कार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांनी सांगितले, आष्टी ते खर्डा उच्चदाब लाईन चुंबळी येथून जाते.प्रभाकर हुलगुंडे यांना पिकाचं नुकसान म्हणून तीन लाख सहा हजार रुपये चेकद्वारे देण्यात आले आहेत.याठिकाणी कामही पूर्ण झाले आहे. परंतु, रात्रीच्या वेळी आनंद हुलगुंडे यांनी टॉवरचे सपोर्ट कापले.त्यामुळे टॉवर एका बाजूला कलला आणि तो त्याच्या अंगावर पडला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
आनंद याचा मागीलवर्षी विवाह झाला होता. त्याच्या पश्चात आई-वडील,पत्नी व एक भाऊ, बहीण असा परिवार आहे. घरातील कर्ता तरुण मुलगा गेल्याने कुटुंबावरदु:खाचा डोंगर कोसळला आहे.त्याचा मृतदेह दुपारी दोन वाजेपर्यंत टॉवरमध्ये अडकलेला होता. पोलिसांनी घटनास्थळी येऊन महापारेषणच्याअधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.