मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (21:28 IST)

जिल्ह्यात 50030 कोविशिल्ड तर 2840 कोव्हॅक्सीन लसीची मात्रा उपलब्ध

कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण असून राज्य शासनातर्फे नागरीकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाला आज नव्याने 50 हजार 30 कोविशिल्ड तर 2 हजार 840 कोव्हॅक्सीन लसीची मात्रा उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
 
गेल्या सप्ताहात जिल्ह्याला कोविड प्रतिबंधात्मक लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला होता. त्यानुसार शनिवारी एकाच दिवसांत 49 हजाराहून अधिक नागरिकांना लसीकरण लाभ देण्यात आला होता. त्यानंतर आज गुरूवार, 26 ऑगस्ट रोजी जिल्हा आरोग्य प्रशासनाला नव्याने 50 हजार 30 कोविशिल्ड तर 2840 कोव्हॅक्सीन लसीची मात्रा उपलब्ध झाली आहे.
जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यत सुमारे 12 लाख 12 हजार 854 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. प्राप्त लसीनुसार जिल्ह्यातील 118 लसीकरण केंद्राना प्रत्येकी 300 ते 800 या दरम्यान लसीचे वितरण करण्यात आले आहे. तर सर्वात जास्त वितरण शाहू महाराज हॉस्पिटल, जळगाव येथे 2 हजार, जिल्हा सामान्य रूग्णालय (रेडक्रॉस सोसायटी) 1500, जळगाव तालुक्यात म्हसावद व नशिराबाद येथे प्रत्येकी 1 हजार, भुसावळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, वराडसीम येथे प्रत्येकी 1000, कठोरा येथे 1100 तर पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे 1 हजार याप्रमाणे लसीचा साठा उपलब्ध करुन देण्यात आल्याचेही डॉ. जमादार यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.