मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 एप्रिल 2021 (08:31 IST)

स्वस्तात खाद्यतेलाचे आमिष पडले महागात! खाद्य तेलाऎवजी मिळाला मार अन लुटले

स्वस्तात गोडेतेलाचे आमिष एका जणास चांगलेच महागात पडले आहे. स्वस्तात खाद्यतेलाचे डबे देण्याचे आमीष दाखवून निर्जनस्थळी बोलावून ६ जणांच्या टोळीने एकास तब्बल ७६ हजार रुपयांना लुटल्याची घटना अहमदनगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात घडली. याप्रकरणी हर्षल शिवशंकर चौधरी यांनी नगर तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
 
याबाबत सविस्तर असे की, सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील हर्षल शिवशंकर चौधरी (वय ३१) यांना नगर तालुक्यातील खडकी येथील यादव व जाधव (पूर्ण नाव माहित नाही) यांनी फोन वरुन आमच्याकडे खाद्यतलाचे डबे आहेत आम्ही तुम्हाला ‘स्वस्तात गोडेतेलाचे डबे देतो’, असे सांगून नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात निर्जनस्थळी बोलाविले.
 
हर्षल चौधरी हे  त्या ठिकाणी आले असता, या दोघांसह इतर ४ अनोळखी इसमांनी त्यांना निर्जनस्थळी नेवून लाथाबुक्क्यांनी व बांबूच्या काठ्यांनी बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली व त्यांच्याकडील ६० हजार रुपयांची रोकड,१० हजार रुपये किंमतीचा आयफोन,३ हजार रुपये किंमतीचा एमआय नोट हा मोबाईल तसेच ३ हजार रुपये किंमतीचे सिरॅमीक कॉपी मनगटी घड्याळ असा ऐवज बळजबरीने चोरुन नेला.
 
याबाबत हर्षल चौधरी यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरुन पोलिसांनी ६ जणांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोसई जारवाल हे करत आहेत.