गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (08:28 IST)

चिडचिड होते म्हणून उपचार घेण्यास गेलेल्या महिलेचा संमोहन तज्ञाकडूनच विनयभंग

समस्या घेऊन आलेल्या महिलेला संमोहन उपचार देण्याच्या नावाने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार पंचवटीमध्ये घडला आहे. या प्रकरणी महिलेने पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दाखल केली आणि संशयित आरोपीला ताबडतोब अटक देखील करण्यात आली आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पंचवटीत राहणाऱ्या एका महिलेला आपली चिडचिड होत असल्याचे जाणवत होते. त्यावर उपचार घेण्यासाठी म्हणून ही महिला पाथरवट लेन येथील संमोहन तज्ञ संशयित दीपक मुठाळ याच्याकडे गेली. तिथे गेल्यानंतर तिला संमोहित करण्यासाठी मुठाळ यानी सूचना दिल्या.
 
मात्र ती संमोहित झाली नाही. यावेळी मुठाळ याने सदर महिलेस हात वर करण्यास सांगून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिला भानावर असल्यामुळे तिच्या हा प्रकार लक्षात आला आणि तिने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित आरोपी दीपक मुठाळ यास अटक केली आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी सांगितले की, या इसमाकडे संमोहन उपचार देण्याची कुठली डिग्री किंवा परवानगी आहे का याबाबत सुद्धा आता तपास करण्यात येणार आहे.