सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 एप्रिल 2021 (09:48 IST)

'या' शहरात ‘व्हेंटिलेटर’ची एकही खाट उपलब्ध नाही

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. रुग्णांना खाटा मिळेनाशा झाल्या आहेत. कोरोनाच्या गंभीर, अतिगंभीर रुग्णांना आवश्यक असलेली ‘व्हेंटिलेटर’ची एकही खाट  महापालिका, खासगी रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर रुग्णांना खाट मिळणे अवघड झाले आहे.
 
मागील दोन महिन्यांपासून शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णवाढीचा दररोज नवीन उच्चांक होत आहे. रुग्णालयात दाखल होणा-यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यात गंभीर, अतिगंभीर रुग्णांचीही संख्या अधिक आहे. परिणामी, गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटर खाटांची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे. महापालिकेच्या वायसीएम, भोसरी, जिजामाता, ऑटो क्‍लस्टर या रुग्णालयांमध्ये गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर आणि बालनगरी, घरकुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये लक्षणेविरहित रुग्णांवर उपचार केले जातात.
 
महापालिकेची रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. नागरिकांना खाट मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. अनेकांना खाट मिळत नाही. त्यामुळे शहरातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. शहरात ‘व्हेंटिलेटर’च्या खाटांची मोठी कमतरता आहे. अतिगंभीर रुग्ण असल्यास त्याला ‘व्हेंटिलेटर’ची खाट मिळणे मुश्किल होत आहे. शहरातील महापालिका आणि खासगी दवाखान्यात आत्ताच्या घडीला व्हेंटिलेटर’ची एकही खाट उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर रुग्णांना खाट मिळणे अशक्य झाले आहे.
 
याबाबत बोलताना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ”शहरात व्हेंटिलेटर खाटांची मोठी कमतरता आहे. महापालिका आणि शहरातील खासगी रुग्णालयात  व्हेंटिलेटरची एकही खाट उपलब्ध नाही”.