शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (20:57 IST)

नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, त्यांच्या समर्थनार्थ राज्यभर धरणं आंदोलन-भुजबळ

नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यांच्या अटकेच्या विरोधात राज्यभरात धरणं, आंदोलन करू असा पवित्रा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला.
 
"नवाब मलिक यांच्या घरी पहाटे ईडीचे लोक गेले. ही दुर्देवाची गोष्ट आहे. मुंबई बॉम्बस्फोटासंदर्भात खटला चालला. काही लोक तुरुंगात गेले. 30 वर्षात नवाब मलिकांचं नाव कधीही आलं नाही. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारवर टीका करतात. निडरपणे ते बोलतात. त्यांचं तोंड बंद करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. पीएमपीएलए कायदा अस्तित्वात नव्हता त्या वेळचं हे प्रकरण आहे. वडाची साल पिंपळाला लावायचा प्रकार. तिन्ही पक्षांवर दबाव निर्माण करायचा. हा प्रकार निषेधार्ह आहे", असं भुजबळ म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, "नवाब मलिकांच्या वकिलाने सगळे आरोप फेटाळले आहेत. सलीमही वारला, हसिना पारकरी वारल्या. वडाची साल पिंपळाला लावायची. आम्ही एकमताने याचा निषेध करतो. हे लोकशाहीविरोधी आहे. जो बोलेल त्याचं तोंड बंद करण्याचा प्रकार आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे कायदेशीररीत्या आणि जनतेत जाऊन मुकाबला करू. उद्या 10 वाजता मंत्रालयाच्या शेजारी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ सरकारचे मंत्री धरणं देणार. परवापासून राज्यभर शांततेने मोर्चा, आंदोलन, धरणं देऊ".
 
"तीस वर्षांत नवाब मलिकांचं नाव नाही आलं. ते आता भाजपविरोधात बोलतात. म्हणून ही शिक्षा आहे. आमच्या दृष्टीने त्यांची चूक नाही. पब्लिक सब जानती है. हे काय चाललंय हे लोकांना कळतं. सरकार पाडण्यासाठी हा आटापिटा सुरू आहे", असं भुजबळ म्हणाले.
 
"राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. गुन्हा काही सिद्ध झालेला नाही. नारायण राणेंना अटक झाली. त्यांना राजीनामा झाला नाही. जोपर्यंत दोषी आहेत हे न्यायदेवतेसमोर सिद्ध होत नाही, तोवर राजीनामा नाही. हे विशिष्ट हेतूने होत आहे", असं भुजबळ यांनी सांगितलं.
 
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. या अटकेनंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.
 
उद्या 10 वाजता मंत्रालयाच्या शेजारी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ सरकारचे मंत्री धरणं देणार. परवापासून राज्यभर शांततेने मोर्चा, आंदोलन, धरणं देऊ असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.
 
"महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या . एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू. कंस आणि रावण सुध्दा मारले गेले...हेच हिंदुत्व आहे.. जय महाराष्ट्र!", असं ट्वीट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
 
नवाब मलिक यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सुरू होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अन्य मंत्री तसंच काँग्रेसचे नेतेही उपस्थित आहेत.
 
नवाब मलिक मंत्रिपदाचा राजीनामा देणार का? त्यांनी राजीनामा दिल्यास अल्पसंख्याक खात्याचा पदभार कोणाला दिला जाणार? मलिकांच्या अटकेसंदर्भात महाविकास आघाडीची भूमिका काय असणार? अशा विविध मुद्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे.
 
2019 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं एकत्र सरकार स्थापन झाल्यापासून, केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप राज्यातील नेते करतात.
 
याआधी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागलं होतं. आता नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि भाजप हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
 
8 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर नवाब मलिक ईडी कार्यालयाच्या बाहेर आले. हसत हसत त्यांनी प्रसारमाध्यमांना हात दर्शवला.
 
वैद्यकीय तपासणीसाठी मलिक यांना जेजे हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे. ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमा होऊ लागल्याने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी दाखल झालं होतं. त्यानंतर नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनाही चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते.
 
दरम्यान, नवाब मलिकांची चौकशी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर जमले होते. त्यांनी तिथे जोरदार घोषणाबाजीही केली.
 
अटक झाली असं म्हणणं योग्य ठरणार नाही- शंभुराजे देसाई
"राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याला पहाटे घरातून नेणं योग्य नाही. त्यासाठी ईडीने नोटीस द्यायला हवी होती. नंतर नोटीस देऊन बोलवायला हवं होतं. असं सकाळी एकाएकी घेऊन जाणं योग्य नाही. ईडी अधिकृतपणे अटक झाल्याचं सांगत नाहीत, तोपर्यंत त्यांना अटक झाली असं म्हणणं योग्य होणार नाही", असं गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटलं आहे.
 
मुस्लिम कार्यकर्ता असेल तर दाऊदचा माणूस म्हणण्याची सवय- शरद पवार
नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात. त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल अशी आम्हाला खात्री होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.
 
शरद पवार यांनी म्हटलं, "त्यांनी कोणती केस काढली आहे? नवाब मलिक यांच्या वरती कोणत्या प्रकरणात कारवाई केली गेली आहे याबाबत मला माहिती नाही. काही झालं विशेषतः कोणी मुस्लिम कार्यकर्ता असेल तर दाऊदचा माणूस आहे म्हणायची सवय आहे. त्याच्यात काही नवीन नाही."
"मी जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा माझ्यावरही असेच आरोप झाले होते. आता वीस-पंचवीस वर्षं झाली तरी पुन्हा तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, सत्तेचा गैरवापर करणं सुरूच आहे. आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांना बदनाम करण्याचा कट रचला गेला आहे. ते केंद्र सरकारवर बोलतात म्हणून त्यांना टार्गेट केलं गेलं आहे," असं शरद पवार यांनी म्हटलं.
 
मलिकांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही तर भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करणार-चंद्रकांत पाटील
"महाराष्ट्राचे कॅबिनेटमंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यांना मंत्रिपदी राहण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या परखड नेतृत्वाची परंपरा आहे. मलिकांनी मंत्रीपदावर राहू नये. त्यांनी राजीनामा दिला नाही तर भाजपला रस्त्यावर उतरावं लागेल. प्रत्येक गोष्ट हे सरकार आंदोलन केल्याशिवाय मान्य करत नाही. अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावेळीही हेच झालं होतं", असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
 
"कशाची वाट पाहताय? एक मंत्री एका मुलीच्या आत्महत्येप्रकरणी बाजूला झाले. एक मंत्री जे राज्याचे गृहमंत्री होते ते तुरुंगात आहेत. गृहमंत्र्यांनी जनतेला कायदा आणि सुव्यवस्थेचा विश्वास द्यायचा असतो", असं त्यांनी सांगितलं.
 
ते पुढे म्हणाले, "मुंबई पोलिसांचे कमिशनर परागंदा होते. आता त्यांच्यावर केसेस सुरू आहेत. पोलीस अधिकारी सचिन वाजे तुरुंगात आहेत. एक मंत्री ईडीची नोटीस येऊनही हजर होत नाहीत. अखेर सक्तीने हजर करावं लागलं. एका मंत्र्याची अलिबागचा 100 कोटींचा रिसॉर्ट तोडण्याची नोटीस केंद्रीय पर्यावरण खातं देतं. एका नेत्याचा बंगला तोडणार होते. त्यांनी स्वत:च तोडला. औरंगाबादच्या एका मंत्र्याच्या मुलावर जमीन अपहरणासंदर्भात फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एका मंत्र्याच्या दोन बायका आहेत जे हिंदू कोडमध्ये बसत नाही. निवडणूक कायद्यात बसत नाही. त्यांनी हे मान्य केलं आहे. यादी सांगताना दम लागला. एवढं सगळं होऊनही कोलमडलं आहे असं वाटत नाही का? "असा सवाल पाटील यांनी केला.
 
या सरकारने घटनेची पायमल्ली कुठे केलेय याची 22 पानांची नोट तयार केली आहे. 12 आमदारांच्या निलंबनासंदर्भात राज्य सरकारचं वर्तन नियमबाह्य होतं असं न्यायालयाने म्हटलं होतं.
 
जो विरोधात बोलतो त्यांच्यावर कारवाई होते- छगन भुजबळ
"मंत्री नवाब मलिक यांना अटक होणं ही दुर्देवी गोष्ट आहे. प्रवक्ता माहिती जनतेसमोर ठेवत असेल तर अशा रीतीने वागू नये. कायदेशीर लढाई लढू. जिथे जिथे भाजपविरोधी सरकार आहे तिथे तिथे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतो. जे काही होतंय ते चुकीचं होतंय. खरं बोलायला लागलात की तुमच्यावर कारवाई होते. हे भाजपविरुद्ध जाणारं आहे. राजीनामा घ्यायचा की नाही हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे", असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
 
तर ईडीचा वेताळ मानगुटीवर बसतो- सचिन सावंत
"मोदी सरकारविरोधात बोललं की ईडीचा वेताळ मानगुटीवर बसतो. पॉलिटिकल इंटेलिजन्स हा मोदी सरकारचा पॅटर्न आहे. केंद्रीय यंत्रणांचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे", असं काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
 
ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणल्यामुळे कारवाईची शक्यता- रोहित पवार
नवाब मलिकांनी महाराष्ट्रातलं ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणलं. त्यात भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांची नावं समोर आली. गुजरातमध्ये 22 हजार कोटीपेक्षा अधिक ड्रग्ज सापडलं. इथं उघडकीस आलेलं रॅकेट गुजरातपर्यंत जाईल असं वाटल्यामुळे कारवाई झाली असेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी व्यक्त केली.
आज संध्याकाळी मलिकसाहेब बाहेर आल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल, असंही रोहित पवार यांनी म्हटलं.
 
यूपीमध्ये ईडीचे सिंग नावाचे अधिकारी होते, त्यांना भाजपने तिकीट दिलं आहे. त्यामुळे सत्तेत असताना, पदावर असताना आम्ही सांगू ते करा, निवृत्तीनंतर आम्ही पुनर्वसन करु असा संदेश भाजप देत असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला.
 
हा सत्तेच्या दुरुपयोगाचा प्रकार- जयंत पाटील
नवाब मलिकांच्या बाबतीत हा सत्तेच्या दुरुपयोगाचा प्रकार आहे. कोणतीही नोटीस न देता राज्यातील एका मंत्र्यांना घेऊन जाणे ही सर्वच गोष्टीची पायमल्ली आहे. हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील आहे, असं मत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.
अलीकडच्या काळात नवाब मलिक यांनी अनेक प्रकरणे बाहेर काढली होती. त्याची प्रतिक्रिया म्हणून कदाचित जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचे काम केले जात असल्याचाही आरोपही जयंत पाटील यांनी केला.
 
राजकीय सूडबुद्धीने कारवाई- दिलीप वळसे पाटील
 
"राजकीय सूडबुद्धीने केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाचे आणखी उदाहरण आज मंत्रिमंडळातील आमचे सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावरील ईडी कारवाईतून दिसून आले. केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून शासकीय यंत्रणांना राजकीय आयुध म्हणून वापरल्याने लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी नवाब मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत", असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
 
संविधानविरोधी कृत्य- जितेंद्र आव्हाड
"केंद्र सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे हे निंदनीय आहे. यातून संविधान व लोकशाही विरोधी काम होते", असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
 
20 वर्षांनी नवाब मलिकांची चौकशी का?- संजय राऊत
"नवाब मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत. जे सातत्यानं बोलत आहेत. असत्याचा पर्दाफाश करत आहेत. मुखवटे ओरबाडून काढत आहेत. सत्य बाहेर काढत आहेत. त्यांच्यामागे आता देशभरात ईडी, सीबीआय लावलं जात आहे," अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
"महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला केंद्रीय तपास यंत्रणा घरी येऊन घेऊन जातात. एखाद्या गोष्टीची चौकशी होऊ शकते. पण ही चौकशी हे 20 वर्षांनी कशी करत आहेत," असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
 
केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल आपण करत राहू, ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारही समोर आणू, त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 
नथुराम गोडसेची विचारधारा अंगीकारून सूडाचं राजकारण- हुसेन दलवाई
"सूडाचं राजकारण आहे. सातत्याने केलं जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना हेच शिकवलं आहे. नथुराम गोडसेची विचारधारा अंगीकारून ते राजकारण करतात. हा नवाब मलिकांपुरता प्रश्न नाही, सगळ्या देशाचा प्रश्न आहे. सरकारी संस्थांचा वापर ही अतिशय गंभीर बाब आहे. अटक करणं चुकीचं आहे", असं हुसेन दलवाई म्हणाले.
 
नवाब मलिकांना झालेली अटक हा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग आहे. त्याचा आम्ही निषेध करतो असं मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.