अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी कालमर्यादेचे बंधन नाही-राहुल नार्वेकर
आमदारांच्या अपात्रतेबाबत सुयोग्य वेळेत निर्णय घ्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्याप्रमाणे सर्व प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र आपण किती दिवसांत निर्णय घ्यावा याबाबत माझ्यावर कुणीही बंधन घालू शकत नाही असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवार दि. १० जुलै रोजी स्पष्ट केले.
आपण नोटीसा दिलेल्या प्रत्येक आमदारांची सुनावणी घेणार आहोत. अपात्रतेबाबत मी निर्णय दिल्यावरच संबंधिताना न्यायालयात जाता येईल असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या मागणीवर सुयोग्य वेळेत निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालायने ११ मे २०२३ च्या निकालात म्हटले आहे. न्यायालयाच्या निकालाला पुढील महिन्यात १० ऑगस्ट रोजी तीन महिने पूर्ण होतील. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार अपात्रेबाबत तीन महिन्यांत निर्णय घ्यावाच लागेल असे म्हटले आहे.
याबाबत शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विधानसभा अध्यक्षांकडून ७ जुलैला शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या ५३ आमदारांना अपात्रतेबाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. या आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक आमदाराला वेळ देऊन प्रत्यक्ष सुनावणी घेणार असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
Edited By - Ratnadeep Ranshoor