शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 मार्च 2023 (13:17 IST)

मुंबईत 1993 ला 11 ठिकाणी स्फोट झाले, मग शरद पवारांनी 12 का सांगितलं होतं?

sharad pawar
आजपासून बरोबर 30 वर्षांपूर्वी – 12 मार्च 1993 चा दिवस.
मुंबईकरांसाठीचा ‘ब्लॅक फ्रायडे’.
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या बेसमेंटमधील कारमध्ये विध्वंसक स्फोट झाला. मृत्यू, जखमी नि सर्वत्र सैरावैरा धावपळ.
 
पण हा पहिला स्फोट होता. पुढच्या अडीच-पावणे तीन तासात मुंबईत एक एक करत ठिकठिकाणी दहाहून अधिक स्फोट झाले.
 
अडीचशेहून अधिक लोकांचा जीव घेणाऱ्या आणि जवळपास पंधराशे लोकांना जखमी करणाऱ्या या साखळी बॉम्बस्फोटानं मुंबईपुरीसह संपूर्ण देशाला हादरवलं होतं. अजूनही या स्फोटाच्या जखमा पूर्णपणे मिटल्या नाहीत.
 
या स्फोटाच्या घटनेवेळी राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. मुंबईतल्या दंगलीनंतर केंद्रीय संरक्षणमंत्रिपदाला राम राम ठोकत महाराष्ट्रात परतलेल्या शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेऊन सहाच दिवस उलटले होते.
 
शरद पवारांनी या साखळी स्फोटांबाबत केलेल्या एका विधानानं पुढे बराच गोंधळ माजवला. 11 ठिकाणी स्फोटाच्या घटना घडल्या असतानाही शरद पवारांनी 12 ठिकाणी झाल्याचं सांगितलं होतं. यावरून वाद झाला.
 
मात्र, असं स्फोटाच्या ठिकाणांची संख्या वाढवून का सांगितली, याबाबत त्यांनी पुढे स्पष्टीकरणही दिलं. तेच आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
 
मंत्रालयापर्यंत स्फोटांचे आवाज
12 मार्चला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, शिवसेना भवन, सेंच्युरी बाजार, एअर इंडिया बिल्डिंग, हॉटेल जुहू सेंटॉर, झवेरी बाजार, प्लाझा सिनेमा, पासपोर्ट ऑफिस वरळी, काथा बाजार वरळी, हॉटेल सी रॉक, सहार विमानतळ (आताचं छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ) या ठिकाणी स्फोट झाले.
 
त्या दिवशी काय घडलं, हे शरद पवारांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती...’ या आत्मचरित्रातील ‘अयोध्या अध्याय आणि नंतर’ या प्रकरणात सविस्तरपणे लिहिलंय.
 
पवार म्हणतात, “मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरच्या मुख्यमंत्री कार्यालयात मी कामकाजात गर्क होतो. बाराच्या सुमारास अचानक धडामदिशी आवाज आला. मी खिडकीपाशी धाववलो. पाहत त एअर इंडियाच्या इमारतीतून लोक सैरावैरा पळताना दिसत होते. तो आवाज बॉम्बस्फोटाचा होता, याची मला खात्री होती.”
 
त्यानंतर शरद पवारांनी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमरजित सिंग सामरा यांनी फोन केला आणि माहिती दिली.
 
पवार पुढे म्हणतात की, “स्फोटं घडलेल्या ठिकाणं पाहता सारी ठिकाणं हिंदूबहुल होती. हिंदू समाजानं पेटून मुंबईत आणखी रणकंदन व्हावं, असा डाव स्फोटांमागे असावा, हे मी ताडलं.”
 
पवारांनी एपीजी अब्दुल कलामांना केला फोन
पवार दिल्लीतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी येण्यापूर्वी भारतेच संरक्षणमंत्री होते. तिथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम त्यांचे सल्लागार होते. पवारांनी त्यांना फोन लावला आणि स्फोटांचं वर्णन केलं.
 
मुंबईतल्या साखळी स्फोटात आरडीएक्सचा वापर झाल्याच्या माहितीला कलामांनी दुजोरा दिला. मग हे आरएडीएक्स कुठे बनतं, असं पवारांनी विचारल्यावर कलामांनी सांगितलं, देहूरोड आणि कराचीत.
 
देहूरोड दारूगोळा कारखान्यात चौकशीनंतर पवारांना कळलं की, तिथे गेल्या दोन वर्षात आरडीएक्स बनवलंच गेलं नाहीय. त्यामुळे कराचीतून मुंबईत आल्याचं स्पष्ट होतं.
 
पवार म्हणतात, “या बॉम्बस्फोटामागच्या मागे आंतरराष्ट्रीय धागेदोरे आहेत, हे स्पष्ट होताच त्याचं गांभीर्य हजार पटीनं वाढलं होतं. त्यावेळी कोणत्याही दृष्टीने मुंबईत पुन्हा जातीय दंगली भडणार नाहीत, एवढी खबरदारी माझ्या दृष्टीने अग्रक्रमाची होती.”
 
‘म्हणून 11 ऐवजी 12 ठिकाणी स्फोट झाल्याचं सांगितलं...’
नक्की स्फोट किती आणि कुठे झाले, याबद्दल वादाला तोंड फुटलं, ते तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या एका विधानानं.
 
साखळी स्फोटांच्या घटनेनंतर तातडीनं शरद पवार दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून जनतेला माहिती देताना म्हणाले की, बॉम्बस्फोट 12 ठिकाणी झाले असून मस्जिद बंदर भागातही स्फोट झाला आहे.
 
मस्जिद बंदरमध्ये स्फोट झाला नसतानाही पवारांनी तिथं स्फोट झाल्याची खोटी माहिती का दिली, याबद्दल त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितलं.
 
पवार याबाबत स्पष्टीकरण देताना म्हणाले होते की, “स्फोटाची माहिती देत असताना जाणीवपूर्व बॉम्बस्फोट 11 ठिकाणी झाले असूनही, 12 ठिकाणी झाल्याचं नमूद केलं. सर्व बॉम्बस्फोट हिंदूबहुल भागात झालेले होते. परंतु कोणतीही जातीय अनुचित प्रतिक्रिया उमटू नये, म्हणून मी मस्जिद बंदर या मुस्लिम भागातही स्फोट झाल्याचं सांगितलं.”
 
पवार पुढे म्हणतात की, “बॉम्बस्फोटाची घटना एका धर्मानं दुसऱ्या धर्माविरूद्ध केलेलं कारस्थान नसून भारताच्या विरोधात घडवून आणलेला कट आहे, असं सांगत परिस्थिती चिघळणार नाही आणि नियंत्रणात राहील, याची काळजी घेतली.”
 
यावेळी पवारांनी स्फोटात वापरण्यात आलेल्या आरडीएक्सबाबतही ‘जाणीवपूर्वक’ चुकीची माहिती दिली होती. ती म्हणजे, हे आरडीएक्स एलटीटीईसारख्या संघटना वापरतात.
 
पुढे याबाबतही त्यांनी ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्तांना ‘वॉक द टॉक’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीतही स्पष्टीकरण दिलं. पवार म्हणाले की, “मी सांगितलं की, एअर इंडियाच्या बिल्डिंगला मी भेट दिली. स्फोटात वापरण्यात आलेलं साहित्य एलटीटीईसारख्या संघटना वापरतात. कारण मला हे प्रकरण धर्मावरून दुसरीकडे न्यायचं होतं. अन्यथा, मुंबईत आणखी समस्या निर्माण झाल्या असत्या.”
 
पुढे मुंबई दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या श्रीकृष्ण आयोगासमोरही शरद पवारांना या विधानांचं स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. तिथेही पवारांनी सांगितलं की, “माझं विधान असत्य होतं. संभाव्य हिंसा रोखण्यासाठी जाणीवपूर्वक घेतलेला तो निर्णय होता.”
 
शरद पवारांच्या दाव्यानुसार, श्रीकृष्ण आयोगानंही त्यांच्या या प्रसंगावधानाचं कौतुक केलं होतं.
 
पुढे मुंबईकरांच्या अंगभूत स्पिरिटमुळे साखळी स्फोटाच्या काही दिवसातच शहर पूर्वपदावर आलं. पण या साखळी स्फोटाच्या जखमी आजही मुंबईच्या अंगावर आहेत. या जखमा कधीही मिटता न येणाऱ्या आहेत आणि कधीही विसरता न येणाऱ्याही!



Published By- Priya Dixit