1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (15:45 IST)

राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय होणार

mobile veterinary
राज्यातल्या प्रत्येक तालुक्याला फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय देणार असल्याची मोठी घोषणा पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल टाकलंय. 
 
राज्यातील प्रत्येक तालुक्यात 2022 पर्यंत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करणार असल्याचे मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गंत नागपूर विभागात 15 फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयांचा जिल्हा परिषद प्रांगणात हिरवा झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला.
 
पहिल्या टप्प्यात नागपूर विभागात फिरत्या 15 पशुवैद्यकीय रुग्णालयांचा प्रारंभ करण्यात आला असून, यातील तीन रुग्णालये जिल्ह्यात असतील. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. पशुसंवर्धन विभागाने रुग्णालये सुरु करुन नवीन पर्वाला प्रारंभ केला आहे.
 
ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषि आणि कृषीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे फिरते पशुवैद्यकीय रुग्णालये ही विभागाची नितांत गरज होती. ती पूर्ण करत असल्याचे सांगून येत्या दोन वर्षात राज्यातील प्रत्येक तालुक्यात ही रुग्णालये सुरु होणार असल्याचे केदार यांनी सांगितले.