शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 13 जानेवारी 2024 (14:58 IST)

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं निधन

Prabha atre Death
ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका प्रभा अत्रे यांच पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. त्या 91 वर्षांच्या होत्या.
शनिवारी (13 जानेवारी) पहाटे झोपेत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मावळली होती.
 
प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
डॉ. प्रभा अत्रे या आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातनाम असलेल्या गायिका होत्या. अत्रे यांनी भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
 
त्या किराणा घराण्याचं प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांनी पुण्यातील ILS लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. तर संगीतामध्ये डॉक्टरेट मिळवली.
 
काही वर्षं त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये कामही केलं. तर त्या मुंबईतील SNDT महिला विद्यापीठात प्राध्यापिका आणि नंतर संगीत विभागाच्या प्रमुख झाल्या.
प्रभा अत्रे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1932 रोजी पुण्यात झाला. गाण्याबरोबरच त्यांनी नृत्याचंही प्रशिक्षण घेतलं होतं.
 
त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे विजय करंदीकर, सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर यांच्याकडून घेतले होते.
 
त्यांना पद्मश्री (1990) पद्मभूषण (2002) आणि संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार मिळाले आहेत.
 
डॉ. अत्रे यांनी संगीत विषयक एकूण 11 पुस्तके लिहिली आहेत.
 
आपली सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनची स्थापना केली होती.
 
तसेच शास्त्रीय संगीताच्या अध्यापनासाठी त्यांनी स्वरमयी गुरुकुल या संस्थेची स्थापना केली होती.
 
‘प्रभा अत्रेंनी किराणा घराण्याचं वेगळेपण टिकवलं’
इतर घराण्यांपेक्षा किराणा घराण्याचं खास वेगळेपण होतं, असं ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
"किराणा घराण्यातील गायक हे स्वर आणि भावना याकडे बारकाईने लक्ष द्यायचे. त्यामुळे त्यांच्या गायनाचं वेगळेपण दिसून येतं. त्यांच्या गायनातून एक वेगळी नजाकत दिसून येते. त्या स्वत: बंदिशकार होत्या. म्हणजे गीत लेखन आणि गायन अशा दोन्ही गोष्टी करायच्या. मुळात त्यांनी संगीत विषयाचा प्रचंड अभ्यास केला. त्यानंतर त्या मैफिलींकडे वळल्या," असं संगोराम यांनी सांगितलं.
 
"डॉ. प्रभा अत्रे यांनी संगीत या क्षेत्राचा बौद्धिक पातळीवर मोठ्या प्रमाणात अभ्यास केला. त्यांनी या विषयात डॉक्टरेट मिळवून काही वर्षं प्राध्यापिका म्हणून काम केलं. त्यामुळे त्यांनी संगीताचा परिपूर्ण विचार आपल्या गायनातून मांडला", असंही संगोराम यांनी म्हटलं.
 
आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिलेल्या निवेदनात प्रभा अत्रेंच्या निधनावर हळहळ व्यक्त केली.
 
"प्रभा अत्रे यांच्या गायनात किराणा घराण्याची वैशिष्ट्ये होती. तसंच त्या उत्तम रचनाकार देखील होत्या. गेले कित्येक वर्ष सवाई गंधर्व महोत्सवात त्यांचे गायन होत असे, आमच्यावर त्यांचा कायमच आशीर्वाद होता. त्यामुळे एक पोरकेपणा जाणवतोय," जोशी यांनी म्हटलं.
 
तर शास्त्रीय गायक रघुनंदन पणशीकर म्हणाले, " प्रभाताई यांचा आवाज हा वेगळाच होता म्हणून त्यांच्या गायनाची छाप अनेकांवर पडली. माझी पिढी, माझ्या आधीची पिढी आणि नंतरची पिढी अशा तीनही पिढ्यांवर डॉ प्रभा अत्रे यांच्या गाण्याची छाप आहे. त्यांचे गाणे आणि बोलणे दोन्ही सुरेलच होते."
 
Published By- Priya Dixit