1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 एप्रिल 2024 (16:16 IST)

विरार-अलिबाग कॉरिडॉरचे काम लवकरच सुरू होणार?

express way
विरार-अलिबाग कॉरिडॉर गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी विरार-अलिबाग कॉरिडॉरचे काम सुरू होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. हा कॉरिडॉर तयार झाल्यानंतर विरार-अलिबाग हा प्रवास पाच तासांऐवजी अवघ्या दीड तासात पूर्ण करता येणार आहे. 

कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी देशातील 14 नामांकित कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. विरार-अलिबाग कॉरिडॉरच्या निविदेची तांत्रिक बोली उघडण्यात आली आहे. कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातील 11 पॅकेजेस तयार करण्यासाठी 14 कंपन्यांनी 33 निविदा सादर केल्या आहेत. 126 किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर दोन टप्प्यात बांधला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 98 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात सुमारे 29 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यात येणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे तांत्रिक बोलीनंतरची पुढील प्रक्रिया लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर केली जाणार आहे.

विरार - अलिबाग कॉरिडॉर तयार करून सरकार एमएम आर चे सध्या सुरु असलेले सर्व प्रकल्प एकमेकांशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे, या अंतर्गत विरार-अलिबाग कॉरिडॉर, अटल सेतू, शिवडी -वरळी कनेक्टर, वसई- भाईंदर पूल, कोस्टल रोड, वर्सोवा- वांद्रे सी लिंक आणि वांद्रे वरळी सी लिंक सह अन्य प्रकल्प जोडले जाणार आहे. 
126 किमी लांबीचा हा कॉरिडॉर मुंबई- अहमदाबाद, मुंबई- नाशिक, मुंबई-पुणे, द्रुतगती महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, पनवेल-जेएनपीटी आणि अटल सेतू यांना जोडला जाईल.

Edited By - Priya Dixit