सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 (08:13 IST)

सुषमा अंधारे विरोधात विश्व वारकरी संघ राज्यभर गुन्हे दाखल करणार

sushma andhare
वारकरी संतांच्याबाबत वक्तव्यानंतर काल सुषमा अंधारे यांनी माफी मागितली असली तरी यावर वारकरी संप्रदायाचे समाधान झालेले नसून त्यांचे विरोधात राज्य सरकारने गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्व वारकरी संघाच्या तुकाराम चौरे महाराज यांनी केली आहे. तसेच राज्यभर सुषमा अंधारे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची तयारी विश्व वारकरी संघाने सुरु केल्याचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज देशमुख यांनी जाहीर केले आहे. वारकरी संप्रदायाचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून राजकीय नेत्यांनी वारकरी संप्रदायातील संतांवर अशा पद्धतीची वक्तव्ये केली तर त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशारा विश्व वारकरी संघाचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज यांनी दिला आहे. तसेच राज्यातील ३६ जिल्हे आणि २७० तालुक्यात पसरलेल्या या संघटनेने आपल्या गावोगावच्या पदाधिकाऱ्यांना सुषमा अंधारे यांच्या विरोधात तक्रार देण्याच्या सूचना दिल्याचे जगन्नाथ महाराज देशमुख यांनी सांगितले.
 
दरम्यान, हिंदू देवदेवता आणि वारकरी संतांच्या अपमाना नंतर शांत कसे राहायचे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वारकरी संप्रदायाची नेहमीच आधार आणि आदरयुक्त होते मात्र आता हिंदू आणि वारकरी संप्रदायाच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या अशा विकृती उद्धव ठाकरे यांनी  पटकन पक्षातून काढून टाकाव्यात, अशी मागणी महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांनी केली आहे. दुसरीकडे, वारकरी संत आणि थोर महापुरुषांच्याबाबत वारंवार अपमानजनक वक्तव्ये येत असताना राज्य शासनाने याच्या विरोधात कडक कायदा करण्याची मागणी वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे ज्ञानेश्वर जळगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 
 
Edited By-Ratnadeep Ranshoor
\