शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मार्च 2023 (14:35 IST)

अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणातील अटक झालेली अनिक्षा जयसिंघानी कोण आहे? काय आहे पूर्ण प्रकरण वाचा पूर्ण रिपोर्ट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिलेल्या तक्रारीवरून डिझायनर अनिक्षा हिला ताब्यात घेण्यात आलं आहे.अनिक्षाने एका फौजदारी गुन्ह्याप्रकरणी आपल्याला 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी केला होता. अनिक्षा जवळपास दीड वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली होती. या दरम्यान या महिलेने अमृता फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेटही घेतली. या भेटीदरम्यान अनिक्षाने अमृता फडणवीस यांना काही बुकींची माहिती देऊ केली. या बुकींद्वारे पैसे कमावून देण्याचा अनिक्षाचा उद्देश होता. तसेच एका फौजदारी गुन्ह्यात वडिलांविरोधातील केस दाबण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच देण्याचाही प्रयत्न केला.
 
हे वृत्त असून आता या प्रकरणातील अनिक्षा जयसिंघानी कोण आहे हे आपण जाणून घेणार आहोत. सोबतच पूर्ण प्रकरण काय आहे हे देखील.
 
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अमृता फडणवीस यांनी अनिक्षाच्या विरोधात जो FIR केला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की अनिक्षाशी पहिली भेट २०२१ मध्ये झाली होती. अमृता फडणवीस यांनी असं म्हटलं आहे की अनिक्षाने त्यांना हे सांगितलं होतं की ती डिझायनर आहे. अनिक्षाने अमृता फडणवीस यांना हे सांगितलं की पब्लिक इव्हेंटमध्ये तुम्ही मी डिझाइन केलेले ड्रेसेस आणि ज्वेलरी परिधान करा. त्यामुळे मला माझ्या ब्रांडचं प्रमोशन करता येईल. अमृता फडणवीस यांनी ही बाब मान्य केली. मात्र अमृता फडणवीस यांनी हा आरोप केला आहे की काही कालावधीनंतर अनिक्षाने तिच्या वडिलांच्या साथीने मला धमकी दिली आणि माझ्याविरोधात षडयंत्र रचलं. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांच्या विरोधात IPC च्या कलम १२० बी नुसार आणि भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अमृता फडणवीस यांनी हा एफआयआर मलबार हिल पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारीला दाखल केली होती.
 
कोण आहे अनिल जयसिंघानी ?
२०१५ मध्ये उल्हासनगरातील कुख्यात क्रिकेट बुकी अनिल जसयसिंघानी याला त्याच्या गोलमैदान परीसरातील घरावर केंद्र शासनाच्या ईडी ह्या विभागाने धाड टाकत ताब्यात घेतले होते. ही धाड आयपीएल क्रिकेट मॅचमधील सट्टा बाजार आणि बेकायदेशीर मनी लॅडरींगशी संबंधित होती. अनिल जयसिंघानी हा राष्ट्रवादी कॉग्रेसचा माजी नगरसेवक आहे. मात्र त्यानंतर तो अनेकवेळा लढला, मात्र जिंकू शकला नाही. अनिल जयसिंघानी या फरार आरोपीवर क्रिकेट बेटिंगचे अनेक गंभीर गुन्हे उल्हासनगर व मुंबई येथील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. मुंबईच्या आझादनगर पोलीस ठाण्यात फसवणूक, खोटे दस्तऐवज सादर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी त्याला फरार घोषित केले होते. त्यानंतर न्यायालयाने उल्हासनगर कॅम्प 2 येथील गोल मैदान परिसरात मोहन लाईफ स्टाईल या इमारतीच्या 1 ल्या मजल्यावर असलेला फ्लॅट 18 ऑक्टोबर 2018 सील केला होता. याच फ्लॅट मध्ये 2019 मध्ये चोरी झाली होती. विशेष म्हणजे त्याचा हा फ्लॅट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर आहे.
 
कोण आहे अनिक्षा?
अनिक्षा जयसिंघानी ही सट्टेबाज अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. अनिलल जयसिंघानीवर महाराष्ट्र, गोवा आणि आसामच्या सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या देणं, फसवणूक करणं असे गुन्हे नोंद आहेत. अनिक्षाने कायद्याच्या विषयात पदवी घेतली. स्वतःला डिझायनर म्हणवणारी अनिक्षा १६ महिने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आहे. अनिक्षा जयसिंघानी ही पेशाने फॅशन डिझायनर आहे. ती कपडे, ज्वेलरी, शूज हे डिझाईन करते. २०२१ मध्ये अनिक्षाने अमृता फडणवीस यांना ती भेटली होती. तिने फॅशन विश्वातल्या विविध गोष्टी सांगितल्या आणि अमृता फडणवीस यांचा विश्वास संपादन केला.
 
काय म्हटलं देवेंद्र फडणवीस यांनी?
“अमृता फडणवीस यांच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही कामे करण्यासाठी प्रयत्न झाला आहे. पहिल्यांदा पैशांची ऑफर देण्यात आली. त्यानंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनिल जयसिंगानी नावाचा एक व्यक्ती आहे. जो गेल्या सात ते आठ वर्षापासून फरार आहे. त्या व्यक्तिवर 14 ते 15 गुन्हे आहेत. अनिल जयसिंगानी यांची एक मुलगी आहे. ही मुलगी 2015-16 च्या दरम्यान अमृता फडणवीस यांना भेटली होती. त्यानंतर तिचे भेटणे बंद झाले होते. मात्र, अचानक पुन्हा 2021 नंतर या मुलीने माझी पत्नी अमृता फडणवीस यांना भेटायला सुरु केली. या मुलीने मी डिझायनर आहे, माझा व्यवसाय सुरु असल्याचे सांगितले. तसेच प्रभावशाली 50 महिल्यांच्या यादीत माझं नाव आल्याचे  त्या मुलीने सांगितले. तसेच आईवर लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन देखील त्या मुलीने अमृता फडणवीस यांच्याकडून करुन घेतले. या माध्यमातून त्या डिझायनर असलेल्या मुलीने आत्मविश्वास संपादन केल्याचे फडणवीस म्हणाले. त्यानंतर त्या मुलीने येणं जाणं सुरु केलं. यातून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच ऑफर दिली गेली
 
देवेंद्र फडणवीस यांनी हे देखील सांगितलं की अनिक्षाकडून अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच देण्याचं आमीष देण्यात आलं होतं. तसंच या मुलीने माझे संपर्क विविध पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी आहेत असंही सांगितलं. आता या अनिक्षाला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून काय काय माहिती मिळते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor