मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (21:23 IST)

सत्ता असताना रझा अकादमीवर तुम्ही बंदी का घातली नाही?, संजय राऊत यांचा सवाल

Why didn't you ban Raza Academy when you were in power ?
महाविकास आघाडी सरकारमध्ये गट-तट पाहिले जात नाहीत. विरोधी पक्षनेते हे देखील मुख्यमंत्री होते. अमरावतीमध्ये दंगल कोणी पेटवली हे देशाला, जनतेला माहीत आहे. गुप्तचर यंत्रणेत काम करणारीही माणसंच आहेत. गुप्तचर यंत्रणा ही काश्मीर, चीन, गाझीपूर बॉर्डर व इतर ठिकाणी सुद्धा फेल झाली होती. अमरावतीतही फेल झाली, पण नंतर परिस्थिती नियंत्रणात आली. तुम्ही सरकारमध्ये होतात, तेव्हा का नाही बंदी घातली, असा सवाल शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला.
फडणवीस यांनी अमरावती शहराला भेट दिल्यानंतर येथे उफाळलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरुन राज्य सरकारवर जबरी टीका केली आहे. रझा अकादमीचे कुणासोबत मधुर संबंध आहेत, हे सर्वश्रुत आहे. भाजपने रझा अकादमीवर बंदी आणण्याची मागणी केल्यास काँग्रेसमध्ये कारवाईचे धाडसच नाही, असा घणाघातही फडणवीस यांनी अमरावती दौऱ्यात केला होता. आता, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलंय. रझा अकादमीवर बंदी घालण्यासंदर्भात सरकार निर्णय घेईल, असेही त्यांनी म्हटलं. केवळ हिंदूंवर गुन्हे दाखल होतात असं नाही. भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल झाले म्हणजे हिंदूंवर गुन्हे दाखल झाले असं म्हणता येत नाही. भाजप जे आंदोलन करतंय, ते राजकीय पोळी शेकण्यासाठी करत आहे. भाजपने आगीत तेल ओतण्याचे काम करू नये. आंदोलन करायचं तर अमरावतीत शांतता राखण्यासाठी करावं, असंही राऊत यांनी म्हटलं.