शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By BBC|
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (13:52 IST)

दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात चुरस का?

uddhav shinde
उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुल इथल्या MMRDA मैदानावर होणार आहे. या दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी जितकी रस्सीखेच झाली, त्याहून अधिक रस्सीखेच गर्दी जमवण्यासाठी आता सुरू झाली आहे. दोन्ही गटाकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे.
 
ठाकरे गटाचं दसरा मेळाव्याला साधारण दीड लाख लोक जमवण्याचं लक्ष्य आहे. तर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंहून दुप्पट गर्दी जमवण्याची तयारी सुरू आहे.
 
कोणाकडून काय तयारी सुरू आहे?
एकनाथ शिंदे गट
प्रत्येक आमदारांवर त्यांच्या मतदारसंघातून लोकांना दसरा मेळाव्यासाठी आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गटाचे नेते आणि उपनेत्यांवर गर्दीचं नियोजन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याच्या आढावा बैठका घेतल्या जात आहेत.

2.5 ते 3 लाख लोक जमवण्याचं टार्गेट नेत्यांना देण्यात आलं आहे.
शेकडो बसेस, इतर गाड्या यासाठी बुक करण्यात आल्या आहेत.
चार ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात येत आहे.
या गाड्यांवर शिंदे गटाच्या मेळाव्याचे स्टिकर लावण्यात येणार आहेत.
एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार किरण पावसकर बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात, "बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना जी तिलांजली इतके वर्षं देण्यात आली होती, ते आता होणार नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सोनं एकनाथ शिंदेंच्या माध्यामातून लुटण्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने लोक एमएमआरडीए मैदानावर दाखल होणार आहेत."
"जे मैदान ठाकरे गटाला मिळालं आहे त्यापेक्षा दुप्पट आसनक्षमता एमएमआरडीए मैदानाची आहे. त्यामुळे आम्हाला 3 लाख लोकांची गर्दी अपेक्षित आहे. तितके लोक 100% उपस्थित राहणार. शस्त्रपूजन आणि रावण दहनाच्या कार्यक्रमाचं मात्र नियोजन अद्याप नाही."
 
उध्दव ठाकरे
उध्दव ठाकरेंना शिवाजी पार्कच्या मैदानावर दसर्‍यासह चार दिवसांची परवानगी देण्यात आली आहे. शिवाजी पार्कवर जास्तीत जास्त क्षमता दीड लाख लोकांची आहे.
 
पक्षात जरी मोठी बंडखोरी झाली असली तरी मुंबईची जनता शिवसेनेसोबत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाचा राहणार आहे. शिवाजी पार्क मैदान पूर्ण भरण्याची जबाबदारी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. मुंबईच्या गटप्रमुखांवर नेस्कोमध्ये झालेल्या मेळाव्यापेक्षा अधिक गर्दी जमवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे .

युवासेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त तरूण कार्यकर्ते आणि महिला संघटनांकडून महिलांना या मेळाव्यात अधिक प्रमाणात सहभागी करण्यावर भर देण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे रावण दहन आणि शस्त्रपूजेचंही नियोजन करण्यात आलं आहे.

शिवसेनेचे नेते आणि आमदार अनिल परब बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "दरवर्षी दसरा मेळाव्यात मुंबई आणि आसपासच्या भागातील लोक सहभागी व्हायचे. पण यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा दरवर्षीपेक्षा अधिक जोरदार होईल. कोणी किती गर्दी जमवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे."
 
"पण मैदानाची क्षमता पाहून एकावर एक व्यक्ती तर बसवू शकत नाहीत. त्यामुळे शिंदे गटाने काय करायचं यावर मी फार भाष्य करणार नाही. पण उध्दव ठाकरेंचे विचार ऐकायला शिवाजी पार्क मात्र भरून आजूबाजूचा परिसरही लोकांच्या गर्दीने फुलून जाईल याची खात्री आम्हाला आहे."
 
आगामी निवडणुकांसाठी शक्ती प्रदर्शन?
शिवसेना कुणाची हा निर्णय आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे. सुप्रिम कोर्टात व्हीप न पाळणे, बंडखोर आमदारांचं निलंबन, उपाध्यक्षाबाबतचा अविश्वास प्रस्ताव असे अनेक मुद्दे प्रलंबित आहेत.
 
पण खरी शिवसेना कोणाची? याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून येण्याआधीच दोन्ही पक्षांकडून गर्दी जमवून, भाषणात आरोप प्रत्यारोप करून खरी शिवसेना आमचीच, हे दाखवण्याचा प्रयत्न दसरा मेळाव्याच्या निमित्ताने केला जाईल.
 
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवून खरी शिवसेना आमचीच? हे लोकांपर्यंत पोहचवता येईल का, हासुद्धा प्रश्न आहे.
याबाबत लोकमतचे सहाय्यक संपादक संदीप प्रधान सांगतात, "जेव्हापासून शिवसेना पक्षात फूट पडली आहे. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी शक्तीप्रदर्शन करण्याची एकही संधी सोडलेली नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचं परंपरागत शक्तीप्रदर्शनाचं व्यासपीठ आहे. त्यामुळे या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून केला जाईल."
 
"सुप्रिम कोर्टाचा निर्णय येईल तेव्हा येईल, पण त्याआधी आपल्याबरोबर किती कार्यकर्ते आहेत, आपली ताकद किती आहे, हे लोकांच्या मनात बिंबवण्यासाठी हे शक्तीप्रदर्शन दोन्ही गटाकडून केलं जाणार. त्यात गर्दी जमवणे हा एक निकष आहे.
 
लोकांचा कौल 40% त्याच्या बाजूने असा संदेश लोकांमध्ये पोहचवण्यासाठी निवडणूकीआधी गर्दी हा महत्त्वाचा निकष आहे. त्यासाठी ही धडपड सुरू आहे. पण काहीही केलं तरी सर्व फैसले हे जनतेच्या दरबारात होतात. त्यामुळे आधीच्या शक्तीप्रदर्शनापेक्षा निवडणुकांच्या मतपेट्यांमधला पाठिंबा हा महत्त्वाचा असतो."
 
Published By - Priya Dixit