शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: सोलापूर , शनिवार, 23 ऑगस्ट 2014 (11:52 IST)

अमेरिकन व युरोपिन आहेत तोपर्यंत लढा होणारच : मुजफ्फर हुसेन

अमेरिकन आणि युरोपिन जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत जगामध्ये लढा होतच राहणार आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत मुजफ्फर हुसेन यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात केले.
 
इराकमध्ये नुरुल मालिकी याचे शिया सरकार असून ते सुन्नी देशांना अजिबात मान्य नसल्याने सध्या इराकमध्ये संघर्ष चालू आहे. कोणतही प्रकारे इराकची विभागणी व्हावी, या मुख्य उद्देशाने हे युध्द चालू आहे. पेट्रोल युध्दाच्या रुपात हा संघर्ष समोर आल्यामुळे त्याचे  दुष्परिणाम अधिक होत आहेत. जगातील बहुतांश क्रूड तेल इराकमध्ये असल्याने आणि इंधनाच्या बाबतीत अजूनही भारत आत्मनिर्भर झालेला नसल्यामुळे या संघर्षाकडे गांर्भीयाने पाहिले पाहिजे. 
 
जगभर सध्या 56 इस्लामी राष्ट्रे असून सगळ्या देशात शिया राहतात, असे सांगून मुजफ्‍फर हुसेन म्हणाले की, जगात असा एकही देश नाही, जिथे शिया राहत नाहीत. पहिल्या महायुद्धानंतर इस्लामाच्या नावावर चालू असलेली मुस्लिमांची दादागिरी संपुष्टात आल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले की, दुसर्‍या महायुद्धानंतर मोठे परिवर्तन झाले. इस्लामाने ज्यांच्यावर अन्याय केला होता, त्या इस्त्रायलासमोर अनेक राष्ट्रे मान झुकवू लागली होती. विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे आणि लावलेल्या शोधांमुळे इस्त्रायलचे महत्त्व वाढीस लागले होते. 
 
मध्य पूर्वेतील सीरियापासून इराकपर्यंत चालू असलेला रक्तपात जर थांबला नाही तर हा संघर्ष तिसर्‍या महायुद्धाचे स्वरूप धारण करू शकतो, असे सांगून हुसेन म्हणाले की, तिसरे महायुद्ध धर्मासाठीच होण्याची दाट शक्यता आहे. आईन्स्टाईनने म्हटल्याप्रमाणे तिसरे महायुद्ध अनेक देशांमध्ये पसरेल व ते दगडांनी लढले जाईल. 
 
विवेकानंद केंद्रात मान्यवरांसह झालेल्या चहापान कार्यक्रमात बोलताना हुसेन म्हणाले की, हिंदुत्ववाद हा एकमेव मानवतावादाचा पुरस्कर्ता आहे. केवळ मानवतेचे भले होण्याचा विचार करून हिंदुस्थान जगद्‍गुरू बनणे अवघड आहे. भारतीयांनी अरबी, पश्तो, कुर्द, उर्दू अशा विविध भाषांचा अभ्यास करून दुश्मनांना समजून घेतले पाहिजे. 56 इस्लामी देशांपैकी 26 अबरी देश आहेत. अरबी भाषेची महती सांगताना हुसेन म्हणाले की, हत्तीसाठी या भाषेत 30 हजार शब्द आहेत तर तलवारीसाठी 24 हजार शब्द आहेत. 
 
मध्यपूर्वेत जो संघर्ष चालू आहे, तो पाहता आगामी काळात आणखी वाईट दिवस येतील, असे ठाम मत व्यक्त करून हुसेन म्हणाले की, जिंकण्यासाठी लढा एवढे एकच तत्त्व सध्या ठासवले जात आहे.