शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|
Last Modified: जळगाव , शनिवार, 10 जानेवारी 2009 (19:02 IST)

जळगावला कृषीभारती प्रदर्शनास सुरूवात

कृषीभारती प्रदर्शनामुळे शेतकर्‍यांना नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करायला मिळणार असून या प्रदर्शनाचा लाभ जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन, जलसंधारण, भूकंप पुनर्वसन व मदत कार्य, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी शुक्रवारी जळगाव येथे केले.

कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तसेच स्व.डॉ.पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या भारत कृषक समाजातर्फे आयोजित व जैन इरिगेशन सिस्टिम प्रायोजित चौथे कृषी प्रदर्शन कृषीभारती-२००९ चे उद्घाटन मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, या प्रदर्शनास राज्यभरातून स्टॉल आले आहेत. यातील माहिती शेतकर्‍यांना अत्यंत उपयुक्त आहे. त्याचा लाभ खान्देशातील शेतकर्‍यांनी घेतला पाहिजे. वाहतूकदारांच्या संपामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांचे नुकसान होणार नाही यासाठी रेल्वेच्या माध्यमातून केळीची ने-आण केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. वाहतूकदारांच्या संपावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ.पाटील यांनी यावेळी विविध स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली.

येथील शिवतीर्थ मैदानावर शुक्रवारपासून हे प्रदर्शन सुरु झाले असून १२ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. आठ राज्यातील शेती आणि शेती संबंधित प्रत्येक उद्योग व्यावसायिकांचे कृषी अवजारांचे ९० पेक्षा अधिक स्टॉल तसेच नवीन बी-बियाणे, खते, ठिंबक सिंचन, महिला बचत गटांच्या उत्पादनाचे, वराह पालन, इमू पालन, ससा पालन, ग्रेप वाईनरी, केळी उत्पादकांसाठीचा फलोत्सव तसेच विविध स्टॉल प्रदर्शनात आहेत. कृषीभारती प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य आहे. कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात भारत कृषक समाजाने विशेष पुढाकार घेतला आहे.