शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑक्टोबर 2016 (08:54 IST)

तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या अन्नछत्राला हजारो भाविक दररोज लाभ घेत आहेत

तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या अन्नछत्राला ०१ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेपासून प्रारंभ झाला आहे. हे अन्नछत्र ११ ऑक्टोबर (विजयादशमी) पर्यंत चालणार आहे. या अन्नछत्राचा हजारो भाविक दररोज लाभ घेत आहेत. तुळजापूरमध्ये नवरात्र महोत्सवात लाखोंची गर्दी असते. येथील भाविक या अन्नछत्रावर प्रसाद घेण्याच्या भावनेने भोजनास येतात. या अन्नछत्राचा लाभ तेथे बंदोबस्तासाठी असलेले पोलीस, गृहरक्षक दलाचे जवान यांनाही होत आहे. 
 
यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे यंदा तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला पायी जाणार्‍या भाविकांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लातूर-तुळजापूर रस्ता भाविकांनी फुलून गेला आहे. अन्नछत्रावर भाविकांची मोठी गर्दी होत आहे. तुळजापूरपासून अलीकडे २० किलोमीटर अंतरावर श्री तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या जागेत नवरात्र महोत्सवानिमित्त अन्नछत्राचा हा महायज्ञ सुरू आहे. यंदाचे हे १६ वे वर्षे आहे. भाविकांना स्टीलच्या स्वच्छ ताटात भोजन दिले जाते. भोजनात एक तरी गोड पदार्थ हमखास असतो. उपवास करणार्‍या भाविकांसाठी शाबूदान्याची खिचडी दिली जाते. तुळजाभवानीच्या दर्शनाला पायी व वाहनाद्वारे जाणारे भाविक या अन्नछत्रावर थांबून या भोजनाचा लाभ घेतात. नंतर काही वेळ मंडपामध्ये आराम करून चहा घेवून तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मार्गस्थ होतात. तुळजापूरमध्ये अन्य ठिकाणाहून आलेले भाविकही या प्रतिष्ठानच्या अन्नछत्रावर येवून देवीचा प्रसाद म्हणून त्याचा लाभ घेतात. तुळजाभवानी मातेला ऐतिहासिक संदर्भ आहे. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्शन घेतल्याचा. त्याचबरोबर साडेतीन शक्तीपिठापैकी एक दैवत म्हणूनही पाहिले जाते. त्यामुळेच मातेच्या दर्शनासाठी नवरात्र महोत्सव काळात शेजारील कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आदी भागातूनही भाविक दर्शनासाठी तुळजापूरला येतात. लातूर शहरातील व्यापारी, उद्योजक, भाविक, तुळजापूर परिसरातील शेतकरी या सर्वांच्या सहकार्यातून हा अन्नछत्राचा महायज्ञ गेल्या १५ वर्षापासून सुरु आहे. विजयादशमीदिनी महाप्रसादाने या अन्नछत्र महायज्ञाचा समारोप होतो.