शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: पुणे , शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (11:46 IST)

तेव्हा आर.आर. पाटलांची दातखिळी बसली होती का?

माझा राजीनामा मागण्याअगोदर ज्या शरद पवारांनी 10 वर्षे केंद्र सरकारमध्ये राहूनही कांदा निर्यातमूल्याबाबतचा प्रश्न सोडविला नाही, त्या शरद पवारांचा राजीनामा घेण्याची हिंमत आर. आर. पाटलांनी का दाखविली नाही, त्यावेळी पाटलांची दातखिळी बसली होती का? असा संतप्त सवाल खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराच्या शुभारंभावेळी गृहमंत्री पाटील यांनी, ‘शेतकर्‍यांचा कळवळा असेल तर राजू शेट्टींनी खासदारकीवर लाथ मारावी. शेट्टी यांनी आपण शेतकर्‍यांचे की सरकारचे हे दाखवून द्यावे,’ असे आव्हान दिले होते. त्यावर शेट्टी यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषदेत पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.
 
यूपीए सरकारने आपल्या कार्यकाळात 10 वेळा कांद्यावरील निर्यातमूल्य वाढविले होते. तसेच निर्यातबंदीही घातली होती. दोन वर्षापूर्वी दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या निर्यातीवरही निर्बध घातले. गरज नसताना साखर आयात करून दर पाडले. शरद पवार 10 वर्षे यूपीए सरकारमध्ये होते. तरी त्यांना हे प्रश्न सोडविता आले नाहीत. त्यावेळी पाटील यांना शेतकर्‍यांचा कळवळा का आला नाही. शेतकरी हिताची आंदोलने सातत्याने दडपण्याचीच त्यांनी भूमिका घेतली. 
 
पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शेतकर्‍यांना लक्ष करणार्‍या पाटील यांचे शेतकरीप्रेम किती बेगडी आहे, हे यावरून दिसते. डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. सतीश शेट्टी हत्या प्रकरणातील आरोपींना पाटील पकडू शकले नाहीत. शेट्टींचे मारेकरी पकडले असते, तर ते पाटील यांच्या धन्यांना आवडले नसते, अशी कोपरखळीही शेट्टी यांनी हाणली. कांदा प्रश्नाबाबत आपण केंद्र सरकारला निवेदन दिले आहे. या निवेदनात कांद्याला जीवनावश्यक वस्तूचा दर्जा द्यावा, निर्यातमूल्यात केलेली वाढ शून्यावर आणावी, कांदा उत्पादकांना अनुदान द्यावे, अशा मागण्या केल्या आहेत. याबाबत आठवडाभरात निर्णय घेणचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. या मागण्यांची सरकारने दखल न घेतल्यास आचारसंहिता असतानाही आंदोलन करू, असेही खासदार शेट्टी यांनी सांगितले. 
 
महायुती टिकली पाहिजे, अशी विनंती घटकपक्षांनी केली आहे. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. कमी पडत असतील तर आमच्या जागाही घ्या, पण भांडण ताणू नका, असे आवाहन शिवसेना-भाजप नेत्यांना शेट्टी यांनी यावेळी केले.