शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , गुरूवार, 31 जुलै 2014 (11:52 IST)

दहीहंडी बालगोविंदाच फोडणार

बालहक्क आयोगाने सुरक्षेच्या कारणास्तव १२ वर्षांखालील मुलांना दहीहंडी फोडण्यास बंदी घातली आहे. मात्र, गोविंदा मंडळांनी हा आदेश मान्य करण्यास नकार दिला असून कारवाई झाली तरी चालेल पण, बालगोपाळच दहीहंडी फोडणार अशी भूमिका गोविंदा पथकांनी घेतली आहे. दहीहंडी समन्वय समितीच्या मुंबईतील परळमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच मंडळांनी यावेळी बालहक्क आयोगाच्या निर्णयाचा निषेधही नोंदवला. 
 
सगळ्यात वरच्या थरावरून दहीहंडी फोडण्यासाठी बालगोविंदांचा सहभाग दहीहंडीमध्ये सर्रास केला जातो. मात्र अनेक वेळा गोविंदा मंडळांनी लावलेले मनोरे कोसळतात. यामध्ये बरेच बालगोविंदा जखमी होतात काहीजण जिवाला मुकतात. त्यामुळे बारा वर्षाखालील मुलांना दहीहंडी वरच्या थरांवर चढविण्यावर महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने बंदी घालण्याचा निर्णय गेल्या काही दिवसांपूर्वी घेतला होता. या बंदीच्या अंमलबजावणीबाबत कायदा यंत्रणांना योग्य ती दखल घेण्याचे आदेशही आयोगाने दिले होते. शिवाय याचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश बालहक्क संरक्षण आयोगाने दिले आहेत. मात्र दहीहंडी समन्वय समितीने या आयोगाच्या आदेशाला केराची टोपली दाखवित दहीहंडी बालगोपाळच फोडणार असा निर्णय बुधवारच्या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे आता बालहक्क संरक्षण आयोग आणि गोविंदा मंडळांमध्येच जुंपली आहे. आयोग यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.