शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नव्या लढाईसाठी सज्ज राहा : पवार

कोल्हापूर- देशाचे धोरण ठरविणार्‍या संसदेत भगव्या कपडय़ात बसून देशाच्या एकतेला आणि अखंडता धोक्यात आणणारी वक्तव्ये करणार्‍या साधू, साध्वी आणि सांप्रदायिक शक्तीला रोखण्याच्या नव्या लढाईसाठी सज्ज राहा. कष्टकरी, शेतकरी, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी यांच्या सरंक्षणासाठी वेळप्रसंगी छातीचा कोट करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कार्यकत्र्यांना केले. 
 
मार्केट यार्डमधील शाहू सांस्कृतिक मंदिरमध्ये हा मेळावा झाला. या मेळाव्याला मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यातच जिल्हा परिषद, नगरपालिकांबरोबरच विधानसभेच्या निवडणुकीचेही रणशिंग फुंकण्यात आले. 
 
पवार म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने अच्छे दिनची केलेली घोषणा निव्वळ भूल आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. पूर्वी आपण अन्य देशातून धान्य आयात करत होतो. आघाडी सरकारच्या काळात शेती उत्पन्नात वाढ केल्यामुळे 18 देशांना आपण अन्नधान्य पुरवत होतो. शेतकर्‍यांच्या आत्महत्येमागे कर्जबाजारीपणा हे मुख्य कारण असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनाही कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. उद्योजकांना कर्जमाफी दिली जाते. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफ केले. दुष्काळात शेतकऱ्यांना मदत केली. कोल्हापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना या योजनेपासून तक्रारीमुळे वंचित राहवे लागले. ते मिळविण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहेत. या सरकारने गेल्या दोन वर्षात काय केले? निवडणुकीत दिलेले शब्दही त्यांनी पाळले नाहीत. हेच यांचे अच्छे दिन आहेत काय?