शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , शनिवार, 11 फेब्रुवारी 2017 (11:42 IST)

पर्यावरणपूरक साहित्यामधून उभारले ‘प्रती कोल्हापूर’

ऐतिहासिक वास्तूचा अभ्यास करून त्यांची उभारणी, बांधकामाची पद्धत कशी आहे हे फक्त अभ्यासामध्ये न ठेवता त्याची प्रत्यक्ष प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना वास्तुशास्त्र समजविण्यासाठी नाशिकमधील आयडीया महाविद्यालयाने नुकताच कोल्हापूरचा अभ्यास दौरा केला. अशाप्रकारे अभ्यास दौऱ्यानंतर ऐतिहासिक वास्तूची प्रतिकृती निर्मितीचा प्रोजेक्ट उभारणारे आयडिया कॉलेज कदाचित एकमेव महाविद्यालय म्हणता येईल.
 
नाशिकमध्ये विद्यावर्धन ट्रस्ट यांच्या मार्फत इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इंव्हारमेन्ट अॅण्ड आर्किटेक्चर अर्थात आयडिया कॉलेज कार्यरत आहे. या महाविद्यालयाच्या एफडीएडी (Foundation Diploma in Architecture and Design) कोर्स जो अकरावी आणि बारावीसाठी समकक्ष आहे. या कोर्सच्या विद्यार्थ्यांनी नुकताच कोल्हापूरचा अभ्यास दौरा केला. त्यानंतर सामान्यपणे विद्यार्थ्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले जाते. मात्र यात बदल करत थेट दौऱ्यातून विद्यार्थ्यांना काय समजले याची प्रतिकृती उभारण्यास सांगितली गेली. यातून विध्यार्थ्यानी उभारलेल्या कलाकृतीचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रतीकृती बनवतांना पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. सोबतच आपल्या आजूबाजूला सापडणाऱ्या साहित्याचा वापर केला आहे. कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी देवीचे मंदीर, कोल्हापुरी चपला, कुस्तीचा आखाडा, अलंकार, संगीत परंपरा यांची आठवण होते. या सगळ्या गोष्टीचा तिथे जाऊन बारकाईने अभ्यास केला. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रतीकृती बनविल्या आहेत.
 
प्रदर्शन सतार बनविणाऱ्या शेवटच्या पिढीला समर्पित
कोल्हापुर संगीतासाठी ही प्रसिद्ध आहे. सध्या सतार बनविणाऱ्याची शेवटची पिढी येथे काम करत आहे. रोजच्या वापरातल्या भाजीच्या टोपल्यापासून आणि मातीच्या मडक्यापासून त्यांनी संगीत वाद्ये बनविली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आदर व्यक्त करत हे संपूर्ण प्रदर्शन सतार बनविणाऱ्या शेवटच्या पिढीला समर्पित केले आहे.
 
कोल्हापूरमध्ये मंदिरावर वेगळ्या धाटणीतल्या स्त्री च्या मूर्ती दिसतात. शहरांमध्ये बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सिमेंटच्या विटेवर कोरीवकाम करत अशीच मूर्ती  विद्यार्थ्यांनी साकारण्यात आली आहे. तर मंदिरातील खांबांची उभारणी पाहिली असता ती वेगळ्या स्वरूपाची आहे. एका दगडातून खांब उभारण्यात आले नसून दोन दगड वैशिष्टपूर्ण रितीने एकमेकांत गुतविले गेले आहेत. अगदी अशीच खांबांची उभारणी प्रदर्शनात करण्यात आली आहे.      
 
kolhapur
अभ्यास दौरा हा आमच्या अभ्यासक्रमामधला महत्वाचा भाग आहे. याआधी आम्ही अहमदाबाद – बडोदा, भूज, ओरिसा या ठिकाणी आधी जाऊन आलो आहोत. यातून विद्यार्थ्यांना थेट शिकता येते. विद्यार्थी प्रचंड उत्सुक असतात. पुढे कामाला सुरुवात केल्यानंतर प्रदर्शनासाठी केलेला अभ्यास, नियोजन आदी गोष्टींचा फायदा त्यांना होतो अशी माहिती एफडीएडीच्या यास्मिन दांडेकर यांनी दिली.   
 
या प्रदर्शनातून अभ्यासक्रमात असलेल्या सर्व विषयांचे थेट सादरीकरण करण्यास आम्ही विद्यार्थ्यांना सांगत असतो. प्रोजेक्टचे रेखाटन, प्रोडक्ट डिजाईन, प्रोडक्ट चे सादरीकरण यांचा यात समावेश होतो. फक्त पुस्तक म्हणजेच अभ्यास नाही. तर आजूबाजूला असणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू मधुनही कलाकृती साकारता येते. ही दृष्टी त्यांना मिळते. मेहनत केल्यानंतर खरी मज्जा येते अस विद्यार्थी अनुभवतात. – विजय सोहनी, प्राचार्य, आयडीया महाविद्यालय, नाशिक.