शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Updated :पुणे , शनिवार, 1 नोव्हेंबर 2014 (10:28 IST)

पश्चिम महाराष्ट्रातील दोघांचा समावेश

महाराष्ट्राच्या नवीन मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्रातील दोघांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातून विजयी झालेले चंद्रकांत पाटील व पुण्यातील कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील दिलीप कांबळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. मात्र चर्चेमध्ये असणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार गिरीश बापट यांचा सहभाग नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 
 
शुक्रवारी दुपारी मुंबईत नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यामध्ये पुणे शहरातून आठ पैकी केवळ एकाच जागेचा समावेश दिलीप कांबळे यांच्या रूपाने मंत्रिमंडळात झाला. यावेळी प्रथमच पुणे शहरातील आठही जागा भाजपने जिंकल्या. त्यामध्ये गिरीश बापट यांचाही समावेश होता. त्यांना वरिष्ठ मंत्री म्हणून सहभागी करून घेतले जाईल असे बोलले जात होते. प्रत्यक्षात त्यांचा समावेश झाला नाही. त्यांना कदाचित विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा रंगू लागली आहे. कांबळे यांनी यापूर्वी युतीच्या सरकारमध्ये समाजकल्याण खात्याच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर ते दुसर्‍यांदा निवडून आले आणि पुन्हा एकदा राज्यमंत्रिपदाचा मान त्यांना मिळाला. 
 
जुलै महिन्यात झालेल्या पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातून भाजपचे दुसर्‍यावेळेस निवडून आलेले चंद्रकांत पाटील यांची वर्णी मंत्रिमंडळात लागली आहे. याआधी त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार होती. पण त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे प्रदेशाध्यक्ष कोण होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात आणखी काही जणांचा मंत्रिमंडळात समावेश होणे शक्य आहे.