शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2016 (13:59 IST)

पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांच्या गणवेशात बदल

सुमारे ६८ वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांच्या गणवेशात बदल होत आहे. नव्या गणवेशामध्ये खाकी रंग कायम आहे. मात्र कर्मचाऱ्याचा हुद्दा जसजसा बदलत जाईल तसा गणवेशाचा रंग फिकट होत जाणार आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी सलवार कुर्ता असा गणवेश असेल. यात कुर्त्यांवर जॅकेट असेल आणि त्याला चार खिसे असतील. साडी नेसणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी जाड काठपदराची साडी व त्यावर जॅकेट असेल. तर यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांना निळ्या रंगाचा गणवेश असणार आहे. रस्त्यात बंद पडलेली बस दुरुस्त करताना रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहन चालकांना चालक-वाहक दिसावे यासाठी गणवेशाला सुरक्षिततेच्या दृष्टीने रिफ्लेक्टर्स लावण्यात आले आहेत. सदरचा गणवेश वर्षांतून दोनदा दिला जाणार आहे. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) ने हा गणवेश डिजाईन केला आहे. राज्यभरातील सुमारे एक लाखाहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षांत हा गणवेश दिला जाणार आहे.