शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 1 ऑगस्ट 2015 (11:00 IST)

महाराष्ट्रातील अकरा शहरे होणार ‘स्मार्ट’

स्मार्ट सिटीसाठी महाराष्ट्रातील ११ शहरांची निवड झाली आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाकरिता मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, ठाणे, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण-डोंबिवली व औरंगाबाद या अकरा शहरांची निवड करण्याचा निर्णय राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने घेतला आहे, याबद्दल माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य मंत्रिमंडळाच्या २३ जुलै रोजी झालेल्या बैठकीत ही योजना महाराष्ट्रात अमलात आणण्यास मान्यता देण्यात आली. देशातील १०० शहरांमध्ये पाच वर्षांच्या कालावधीकरिता हे अभियान राबवण्यात येणार असून त्यासाठी ४८ हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केंद्राकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेकरिता महाराष्ट्रातून १० शहरांची निवड करायची होती. परंतु प्रत्यक्ष़ात अकरा शहरांची निवड केली गेली आहे. याकरिता एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ३६ शहरांमध्ये स्पर्धा होती. या योजनेत शहरांमधील प्रमुख नागरी समस्यांचे निवारण करण्याकरिता केंद्र सरकारकडून ५०० कोटी रुपयांचा निधी पाच वर्षांत देण्यात येणार असून उर्वरित ५०० कोटींचा निधी राज्य सरकार व महापालिकेने उभा करायचा आहे.

त्यामुळे ज्या शहरांचा या योजनेत समावेश केला जाईल त्यांना २५० कोटी रुपयांची तजवीज करावी लागणार आहे. परिणामी लोकसंख्येच्या निकषानुसार योजनेस पात्र असणारी शहरे आर्थिक निकषावर मागे पडली.