शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 सप्टेंबर 2014 (13:16 IST)

सहा काश्मिरी युवकांना अटक

देशी बनावटीच्या 25 रायफल गन विनापरवाना बाळगल्या प्रकरणी सहा काश्मिरी युवकांना कासार्वाद्वली पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली. या सहाही काश्मिरी युवकांना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. अटक करण्यात आलेले काश्मिरी युवक हे ठाण्यातील एका सुरक्षा एजन्सीत सुरक्षा रक्षकाचे काम करतात. तर या युवकांनी रायफल्स सुरक्षा एजन्सीच्या कामासाठीच स्वत:जवळ बाळगल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

काही काश्मिरी युवक कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तुकाई चाळ, खोली क्रमांक 10, घोडबंदर रोड येथे अनधिकृतरित्या राहत असल्याची व त्यांच्या कडे काही शस्त्रसाठा असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपायुक्त व्ही. बी. चंदनशिवे यांना मिळाली होती. चंदनशिवे यांनी ही माहिती त्वरित कासारवडवली पोलिसांना कळवली व कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार कासारवडवली पोलिसांनी शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास तत्काळ घटनास्थळी सापळा लावून सहा काश्मिरी युवकांना ताब्यात घेतले. हे युवक राहत असलेल्या खोलीची यावेळी पोलिसांनी झडती घेतली असता तिथे एका पेटीत ठेवलेल्या तब्बल 25 देशी बनावटीच्या रायफल्स गन पोलिसांना मिळून आल्या. या रायफल्स बाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या युवकांनी सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. नंतर या सर्व रायफल्स या युवकांनी बेकायदेशीररित्या जवळ बाळगल्याचे व त्यांचा कुठलाही परवाना त्यांच्या कडे नसल्याचे तपासात समोर आले. कासारवडवली पोलिसांनी या 25 रायफल्स जप्त केल्या असून त्या सहा काश्मिरी युवकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या काश्मिरी युवकांना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली.