शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 23 ऑगस्ट 2014 (11:20 IST)

स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा - राणे

बेळगाव-कारवार पट्टय़ातील ८६५ मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही, असे जाहीरपणे सांगतानाच राज्याचे उद्योगमंत्री व काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी वेगळ्या विदर्भाला मात्र काँग्रेसचा विरोध नसल्याचे सांगून महाराष्ट्राच्या विघटनाला जाहीर पाठिंबा दिल्याने एकच खळबळ उडाली. याच वेळी त्यांनी येत्या १ सप्टेंबरपासून राज्यात काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल, असे जाहीर केले.
 
काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख राणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी प्रचार समितीची पहिली बैठक पक्षाच्या टिळक भवन या मुख्यालयात पार पडली. प्रचार यंत्रणा कशी राबवायची, प्रचार सभा, सभेसाठी कोणत्या वक्त्यांना बोलवायचे, निवडणुकीतील मुद्दे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले. येत्या १ सप्टेंबरपासून हुतात्मा चौकातून ज्योत पेटवून विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यात ही ज्योत घेऊन कोणत्या मुद्यांवर निवडणूक लढविणार आहोत, याची माहिती काँग्रेसचे कार्यकर्ते जनतेला देणार आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या १0५ हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन भाजपाविरोधात प्रचाराचे रान उठविणार, असे त्यांनी सांगितले. आघाडी सरकारने मागील १५ वर्षांत जी विकासकामे केली ती आम्ही जनतेसमोर घेऊन जाऊ. मेट्रो, मोनोरेल, आयटी सिटी, उद्योग, रोजगार, मुंबईसह वेगवेगळ्या शहरांत बांधलेले उड्डाणपूल यासह आघाडी सरकारने केलेली सर्व विकासकामे आम्ही जनतेसमोर मांडू. या विकासकामांच्या जोरावर राज्यातील जनता आघाडीला पुन्हा निवडून देईल, असा विश्‍वास राणे यांनी व्यक्त केला.
 
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून योग्य वागणूक मिळाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून मोदी हे भाजपाचे नव्हे तर देशाचे पंतप्रधान आहेत, असा टोला त्यांनी लगावला. भविष्यात मुख्यमंत्र्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असेही ते म्हणाले. सरकारची गेल्या चार वर्षांतील कामे विजयासाठी पुरी आहेत, असे सांगतानाच आपण विधानसभेची निवडणूक लढवायची की नाही, याचा योग्य वेळी निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले. दिल्लीचे कोणतेही नेते महाराष्ट्रात प्रचाराला आले तर आम्हाला त्याचा उपयोगच होईल, असे सांगतानाच त्यांनी प्रियंका गांधी यांनी प्रचारात भाग घ्यायचा की नाही, हे त्यांनी ठरवायचे आहे, असे राणे म्हणाले.
 
भास्कर जाधव यांच्याबद्दल नीलेश यांचे मत वैयक्तिक आहे. त्याच्याशी काँग्रेस पक्षाचा कसलाही संबंध नाही, असे स्पष्ट करतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत गुहागरमध्ये लोकसभा निवडणुकीचे पडसाद बघायला मिळतील, असे राणे म्हणाले. पक्षाने आदेश दिल्यास आणि त्या वेळची परिस्थिती पाहूनच आपण गुहागरमध्ये प्रचाराला जाऊ, असे ते म्हणाले.