शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

ही तर मुख्यमंत्र्यांची लाचारी- राज ठाकरे

ND
ND
मुंबईत टॅक्सीवाल्यांसाठी मराठी बंधनकारक करण्याचा निर्णय मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी २४ तासांत मागे घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आयताच मुद्दा मिळाला आहे. मुंबईत नव्याने दिलेले परवाने मराठी तरूणांनाच दिले पाहिजे, अन्यथा या नव्या टॅक्सी मुंबईत फिरू देणार नाही, अशी स्पष्ट धमकी राज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली.

इतकेच नव्हे तर या आधीचे जे परवाने दिले गेले आहेत, त्यांनाही मराठी येते की नाही हे तपासून बघा असे सांगतानाच मंत्रिमंडळाचा निर्णय मुख्यमंत्री कसा फिरवू शकतात असा सवालही राज यांनी केला. अशोक चव्हाण हे दिल्लीश्वरांचे कृपेने मुख्यंत्रिपदावर बसवलेले आहेत. हा निर्णय घेतल्यानंतर वरून दट्ट्या आल्यानेच त्यांना हा निर्णय बदलावा लागला असावा असे सांगताना, हिंमत नव्हती तर मग हा निर्णय घेतलात का? स्वाभीमान नावाचा काही भाग त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे की नाही असा प्रश्नही त्यांनी केला.

चव्हाणांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम रहायला हवं होतं. पण त्यांनी आपली लाचारी दाखवून दिली, अशा शब्दांत राज यांनी त्यांच्यावर टीका केली. महाराष्ट्र म्हणजे युपी नि बिहारच्या मंडळींसाठी स्थापन केलेली धर्मशाळा नाही, असेही त्यांनी सांगितले.

वेगळ्या विदर्भासंदर्भातही त्यांनी मत व्यक्त केलं. विदर्भ वेगळं करणे हा त्याच्या विकासाचा इलाज नाही. विदर्भाकडे नक्कीच लक्ष द्यायला हवे. पण तसेच लक्ष कोकण, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या मागास भागांकडेही द्यायला हवे. विदर्भाच्या आंदोलनांच्या निमित्ताने पडद्याआड गेलेले नेते पुढे येताहेत, अशी टीका त्यांनी केली.