शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 23 मे 2015 (11:32 IST)

‘अच्छे दिन’ची ‘पुण्यतिथी’

केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारला येत्या 26 मे रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. परंतु या वर्षभरात निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासण्यात आला आहे. भाजप सरकारने आश्वासनपूर्ती केली नाहीच, तर देशाचा र्‍हास केला. त्यामुळे मोदी यांनी ज्या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्या दिवशी राज्यभरात ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी साजरी करण्यात येईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. सरकारमध्ये राहून विरोध करण्यापेक्षा शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडावे असा सल्ला चव्हाण यांनी दिला.
 
चव्हाण म्हणाले की, देशात परिवर्तन व्हावे, काँग्रेसचे सरकार उलथून टाकावे म्हणून मोदी यांनी देशभरात जनतेला फसवी आश्वासने दिली. लोकांना फसवून मते मिळविणे हाच त्यांचा उद्देश होता. त्यांना मते मिळाली, पण लोकांना दिलेली आश्वासने ते विसरले. संपूर्ण वर्षात आश्वासनांची पूर्ती झालीच नाही. निवडणुकीपुरत्या दिलेल्या त्या थापा ठरल्या आहेत. जनतेच्या हे लक्षात आल्याने त्यांच्या मनात जी खदखद आहे ती आम्ही ‘अच्छे दिनची पुण्यतिथी’ घालून प्रकट करणार आहोत, असे चव्हाण म्हणाले.
 
पेट्रोल स्वस्त करणार, महागाई रोखण्यात येईल, अडीच कोटी नागरिकांना नोकर्‍या देणार, काळा पैसा भारतात आणणार, शेतकर्‍यांच्या मालाला नफा मिळवून देणार, दुष्काळग्रस्तांना मदत करणार, औषधे स्वस्त करणार, दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करणार, चीनला वठणीवर आणणार अशा पद्धतिची विविध आश्वासने मोदी यांनी दिली होती. पण या वर्षभरात त्यातील कोणतेही आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. मात्र आपले अपयश लपवायला आता ते 'आपण कालमर्यादा दिली नव्हती' असे सांगत आहे.