मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. प्रजासत्ताक दिन
Written By वेबदुनिया|

राष्ट्रध्वजाचा मान राखा

26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या हर्षोल्हासाने साजरा करी‍त असतो. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले तर काहींना घरदार सोडावे लागले आहे. एवढेच नाही तर आज बॉर्डरवर आपले सैनिक डोळ्यात तेल घालून अहोरात्र जागून देशाचे आपल्या शत्रूपासून संरक्षण करीत आहे. म्हणूनच तर आपण आपल्या आलिशान घरांमध्ये स्वस्थ आहोत. मात्र गेल्या काही वर्षापासून आपल्या देशाचे मानचिन्ह 'तिरंगा' झेंड्याची अवहेलना होत असल्याचे दिसत आहे.

भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताकदिनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीयाला दिले आहे. या दिवशी मोठ्या अभिमानाने सर्वजण ‘कागदी’ किंवा ‘प्लास्टिक’ चे राष्ट्रध्वज, बिल्ले, स्टीकर मिरवत असतात. मात्र हेच ध्वज दुसर्‍या दिवशी गचरा कुंडी, गटरीत फाटलेल्या अवस्थेत दिसतात. आणि आपली भारतीय स्वतंत्र जनते तेच ध्वज पायाने तुडवतात. मात्र ते उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट लावत नाहीत.

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करता येणार नाही, या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाला लाथाळून सर्रासपणे असे ध्वज तयार केले जात असून भारतीय जनता आपल्या मुलांना त्या ध्वजाचे महत्त्व न सांगता त्यांना खुशाल असे प्लास्टिकचे ध्वज खरेदी करून देत असतात. 

मुले तर मुलेच ना, त्यांना या ध्वजाचे महत्त्व माहित नसल्याने त्यांच्याकडून अशा चूक होणारच. परंतु पालकांनी सजगता दाखवून अशी प्लास्टिकचे ध्वज खरेदी करू नयेत. तरच त्याचे उत्पादनाला आपोआप खिळ बसेल.

क्रिकेट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांकडूनही आपल्या ध्वजाचा अवहेलना केली जाते. त्यांना तोंड व परिधान केलेल्या कपड्यावर तिरंगा रंगवून घेतांना काहीच कसे वाटत नाही. याचे आश्चर्य वाटते. आपण सांगा हे कितपत योग्य आहे. ध्वजाला कपड्यावर नाही तर मनावर स्थान पाहिजे. आणि ते आपल्या कर्तृत्त्वातून जाणवत असते.

शासनाने प्लास्टिकच्या ध्वज तयार करणारे उद्योग बंद पाडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. असा सूर स्वातंत्र्य सैनिकांमधून निघत आहे.