शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शिवजयंती
Written By वेबदुनिया|

रयतेचा राजा: छत्रपती शिवाजी महाराज- बाबासहेब पुरंदरे

आपल्या अलौकिक पराक्रमाने, कर्तृत्वाने मुघल साम्राज्यात महाराष्ट्रीयन बाणा सतत कायम ठेवणार्‍या छत्रपती महाराजांची आज जयंती. महाराजांनी आपल्या युध्द कौशल्याने महाराष्ट्राची आन, बान, मान आणि शान सतत उंचावत ठेवली. आपल्या ५० वर्षाच्या आयुष्यामध्ये केवळ प्रजेसाठी... महाराष्ट्राच्या खचलेल्या... पिचलेल्या जनतेच्या आयुष्यात समतेचा... न्यायाचा व स्वातंत्र्याचा दिवस उगवावा यासाठी शेवटपर्यंत कार्यरत असणार्‍या या लोकोत्तर राजाची आज जयंती....या जयंतीनिमित्त शिवशाहीचे गाढे अभ्यासक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेशी साधलेला खास संवाद.

प्रश्न : बाबासाहेब शिवसृष्टीच्या तुलनेत आजचे स्वराज्य आपण कसे पहाता ?
उत्तर : प्रत्येक व्यक्तीने स्वराज्यावरील आपल्या निष्ठा पक्क्या ठेवल्यास राज्य सुकर चालवता येऊ शकते. ही महाराजांची त्यावेळची विचार प्रणाली होती. वास्तविक जीवनात महाराजांची ही विचारधारा प्रत्येकाने आत्मसात केल्यास महाराष्ट्र हे ‘महान राष्ट्र’ बनेल.

प्रश्न : शिवचरित्रातील आपणाला कोणता प्रसंग अधिक भावतो ?
उत्तर : संपूर्ण शिवचरित्रच मराठी मनाला भावते. परंतु मला भावणारा प्रसंग म्हणजे राजमाता जिजाबाईंनी आपल्या मृत्युनंतर शिवाजी महाराजांची आबाळ होवू नये म्हणून त्याकाळी सुमारे १ कोटी रुपयांची तरतूद करुन ठेवली होती. यातून जिजाबाईचे आईपणाचे महत्त्व आपणाला दिसून येते. शिवचरित्रातील हा प्रसंग खरोखरच विलक्षण म्हणावा लागेल.

प्रश्न : महाराजांच्या मातृभक्ती बद्दल काही सांगा ?
उत्तर : महाराजांची मातृभक्ती अद्वितीय होती. ‘माँ’ साहेबाबद्दल त्यांना प्रचंड आदर होता. महाराजांचे मातृप्रेम केवळ दिखावा नव्हते, तर ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार होते. एक उदाहरण सांगतो, महाराज आग्राच्या कैदेमध्ये असताना महाराजांनी आपला संपूर्ण कारभार आई साहेबांकडे सोपविला होता. राज्य कारभाराबाबत माँ साहेबांचा आदेश सर्वांनी पाळावा अशा सक्त सूचना त्यांनी आपल्या सर्व सरदारांना दिल्या होत्या. यातून ‘आई’ या विद्यापीठावरील महाराजांचा विश्वास व्यक्त होतो.

प्रश्न : महाराजांच्या दूरदृष्टीबद्दल सांगाल?
उत्तर : महाराजांच्या दूरदृष्टीबद्दल काय सांगावे ! महाराजांकडे दूरदृष्टी होती म्हणूनच अनेक जीवघेण्या प्रसंगातून ते सहीसलामत बचावले. अनेक प्रसंग सांगता येतील. मात्र मी थोडक्यात सांगतो. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचे सर्वच निर्णय एकत्रित बसून विचार विनिमयाद्वारे घेतले जात असत. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या निर्णयाला महत्व प्राप्त होत असे. महाराजांनी त्यांच्या राजेपदाच्या कारकिर्दीत अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. तसेच युद्धावर जाताना तोफा, हत्ती व स्त्रियांना सोबतीला घेण्यास परवानगी नाकारली कारण या गोष्टी गनिमी काव्यामध्ये अडचणीच्या ठरतात. हे महाराजांनी जाणले हेते. केवढी मोठी ही दूरदृष्टी...

प्रश्न : महाराजांच्या मुत्सद्दीपणाबद्दल काय सांगाल?
उत्तर : महाराज हे न्यायी...धोरणी...मुरब्बी राजकारणी तसेच मुत्सद्धी होते यात शंकाच नाही. त्या दृष्टीने एक प्रसंग सांगू इच्छितो, सन ८ ऑगस्ट १६४८ साली विजापूरच्या आदिलशहाने शहाजी राजांना कैद केले. या घटनेने महाराज अस्वस्थ झाले परंतू लगेचच सावरले....‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या नात्याने त्यांनी दिल्लीचा राजपुत्र ‘मुराद’ याच्याशी संगनमत करुन शहाजी राजांची सुटका केली.

प्रश्न : बाबासाहेब आता शेवटचा एक प्रश्न...महाराजांच्या राज्यकारभाराविषयी थोडसं ?
उत्तर : महाराजांचा राजकारभार नेक होता. ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये’ अशा सक्त सूचना त्यांनी आपल्या सर्व सरदारांना...अधिकार्‍यांना दिल्या होत्या ... महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये राज्यात एकदाही ‘दुष्काळ’ पडल्याचे उदाहरण सापडत नाही. तरीही कर्तव्यदक्ष... रयतेचा राजा... म्हणून महाराजांनी प्रजेची अत्यंत आस्थेने काळजी घेतली होती. त्यांनी रयतेसाठी सर्व किल्ल्यावर धान्याचा साठा मोठ्या प्रमाणावर जमा करुन ठेवला होता. तसेच किल्ल्यावर ‘शफाखाना’...आजच्या भाषेत दवाखाना... उघडला होता. जेणेकरुन प्रजेच्या आरोग्य विषयक तक्रारी दूर होतील. इतकी काळजी महाराज प्रजेची घेत होते. म्हणूनच जवळपास ३०० ते ३५० वर्षे प्रत्येक महाराष्ट्रीयन मनाने महाराजांची मुद्रा आपल्या काळजावर कोरली आहे.... महाराजांच्या जयंती निमित्त माझा मानाचा... त्रिवार मुजरा!
(महान्यूज)