शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 ऑगस्ट 2024 (07:48 IST)

Jivati Puja 2024 जिवती पूजन विधी, कहाणी व आरती

shravan shukravar
जिवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे. श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जिवती पूजन हे व्रत केलं जातं. जिवती या व्रताची देवता आहे. जिवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे.
 
श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जिवतीचे चित्र काढून किंवा जिवतीचे छापील चित्र लावून स्त्रिया त्याची पूजा करतात. शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जिवती आईला त्यांचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते.
 
श्रावणी शुक्रवार व जिवती पुजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे. श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी लक्ष्मीची आराधना करून सवाष्णींना पुरणाचे भोजन व हळदी-कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो. श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पुजा करतात. या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात. ही पुजा संतती रक्षणार्थ मानली जाते.
 
जिवती पूजा विधी
जिवतीचे चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार (जसे मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) येईल त्या दिवशी देव्हार्‍याच्या भिंतीवर लावावा.
श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व देवी लक्ष्मीची आणि जिवतीची पुजा करावी.
फुले, आघाडा व दुर्वा ह्यांची एकत्र करून केलेली माळ, कुंकू लावलेला 21 मण्यांचा कापसाचा चौसर देवीला घालावा.
गंध, हळद-कुंकू, अक्षता वाहाव्या.
जिवतीची आरती करावी.
विड्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळ ठेवून दुध्-साखरेचा आणि गुळासह चणे-फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा.
स्वयंपाकात वरण-भात-तूप, लिंबू, चटणी, कोशिंबीर, वाटली डाळ, आमटी, फळ भाजी, पातळं भाजी, पुरण, खीर, कढी, तळण, असा बेत करावा.
ह्या दिवशी मुलांना वाण म्हणून "आरत्या" देतात त्या कराव्या.
(आरत्या- कणकेत गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकेरीत तळलेया पुर्‍या.)
देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा.
सवाष्णीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी.
जेवावयास बसण्यापुर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा.
जेवण झाल्यावर सवाष्णीची खणा-नारळाने ओटी भरावी.
जिवतीची पुजा आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना ओवाळावे.
कुंकू लावून चणे गूळ फुटाण्याचे व आरत्याचे वाण द्यावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, व दिर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी.
मुलं परगावी असल्यास चारी दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्या सारखे होतं. 
या दिवशी शुक्रवारची कथा वाचावी.
 
शुक्रवाराची जिवतीची कहाणी
आटपट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहात होता. तो दारिद्रयानं फार पिडला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं गाईलं. शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, बाई, बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास करवा, संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं, तिचे पाय धुवावे, तिला हळदकुंकू द्यावं, तिची ओटी भरावी, साखर घालून दूध प्यायला द्यावं, भाजलेल्या हरभर्‍याची खिरापत द्यावी, नंतर आपण जेवावं. या प्रमाणे वर्षभर करून तंतर त्याचं उद्यापन करावं. असं सांगितलं. ही घरी आली, देवाची प्रार्थना केली व शु्क्रवारचं व्रत करू लागली.
 
त्याच गावात तिचा भाऊ रहात असे. तो एके दिवशी सहस्त्रभोजन घालू लागला. सार्‍या गावाला आमंत्रण केलं. बहिणीला काही बोलावलं नाही. ती गरीब, तिला बोलावलं तर लोक हसतील. पुढं दुसर्‍या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत आहते, पोटभर जेवीत आहेत. बहिणीनं विचार केला. आपला भाऊ सहस्त्रभोजन घालतो आहे, बोलावणं करायला विसरला असेल, तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही! असा मनात चिवार केला. सोवळं नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली.
 
पुष्कळ पानं मांडली होती, एका पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली, सारं वाढणं झालं, तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तिच्या पानाशी आला, ती खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, ''ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही. तुझ्‍याकडे पाहून सगळे लोक हसतात, ह्यामुळे मी तुला काही बोलावलं नाही. आज तू जेवायला आलीस ती आलीस, आता उद्या येऊ नको! असं सांगून पुढे गेला. ही आपली तशीच जेवली, हिरमुसलेलं तोंड केलं, मुलांना घेऊन घरी आली.
 
दुसरे दिवशी मुलं म्हणू लागली, आई, आई, मामाकडे जेवायला चला! बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं? आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडला, तितकाच फायदा झाला. असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला केली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली, ताई ताई, भिकारडी ती भिकारडी, आणि सांगितलेलं ऐकत नाहीस, तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं, आज आपल्या डुकरिणीसारखी पोरं घेऊन आलीस! आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालवून देईन. तिनं ते मुकाट्‍यानं ऐकून घेतलं, जेवून उठून चालती झाली. पुन्हा तिसरे दिवशी जेवायला गेली. भावानं पाहिलं, हात धरून घालवून दिली. फार दु:खी झाली. देवाची प्रार्थना केली. सारा दिवस उपवास घडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली.
 
असं करता करता वर्ष झालं. बाईचं दरिद्र गेलं. पुढं एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलावलं. भाऊ मानत ओशाळा झाला. बहिणीला म्हणू लागला ताई, ताई, तू उद्या आली नाहीस, तर मी तुझ्या घरी येणार नाही. बहिणींन बरं म्हटल. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसर्‍या दिवशी लवकर उठली, वेणीफणी केली, दागदा‍गिने ल्यायली, उंची पैठणी नेसली आणि भावाकडं जेवायला गेली. तो भाऊ वाट पहात होता. ताई आली तशी तिचा हात धरला, पाटावर बसवलं, पाय धुवायल ऊन पाणी दिलं, पाय पुसायला फडकं दिलं. इतक्या जेवायची पानं वाढली. ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसल्यापाटी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल, नंतर ताई आपले दागिने काढू लागली. बसल्यापाटी ठेवू लागली. भावाने विचार केला जड झाले म्हणून काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवलू. भावानं विचारलं, ताई ताई, हे काय करतेस? ती म्हणाली, दादा, मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलावलंस तिला मी भरवते आहे. भावाला काही हे समजेना. त्यांन तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई तू आता जेव तरी.
 
तिनं सांगितलं, बाबा हे माझं जेवण नाही. हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होत ते मी सहस्त्रभोजनाचे दिवशी जेवले. इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले, झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केल नंतर दोघंजणं जेवली. मनातली आढी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं, तसं तुम्हा आम्हां करो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
 
श्री जिवतीची आरती
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । 
सुखी ठेवी संतति विनंति 
तव चरणी ॥ धृ. ॥ 
श्रावण येतांची आणूं प्रतिमा । 
गृहांत स्थापूनी करुं पूजना । 
आघाडा दूर्वा माळा वाहूं या । 
अक्षता घेऊनी कहाणी सांगू या ॥ १ ॥ 
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । 
सुखी ठेवी संतति विनंती 
तव चरणी ॥ धृ. ॥ 
पुरणपोळीचा नैवेद्द दावू । 
सुवासिनींना भोजन देऊ । 
चणे हळदिकुंकू दूधही देऊं । 
जमुनी आनंदे आरती गाऊं ॥ २ ॥ 
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । 
सुखी ठेवी संतति विनंति 
तव चरणी ॥ धृ. ॥ 
सटवीची बाधा होई बाळांना । 
सोडवीसी त्यांतूनी तूंची तयांना । 
यासाठी तुजला करिती प्रार्थना । 
पूर्ण ही करी मनोकामना ॥ ३ ॥ 
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । 
सुखी ठेवी संतति विनंति 
तव चरणी ॥ धृ. ॥ 
तुझिया कृपेने सौख्य नांदू दे । 
वंशाचा वेल वाढूं दे । 
सेवा हे व्रत नित्य घडूं दे । 
मनीचे हेतू पूर्ण होऊं दे ॥ ४ ॥ 
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । 
सुखी ठेवी संतति विनंति 
तव चरणी ॥ धृ. ॥