शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By वेबदुनिया|

श्रावणभक्ती

श्रावण आणि श्रवण यांचा अनुबंध फार पुरातन आहे. श्रावण हा श्रवणभक्तीचा महिना होय. श्रावणात अनेक षिवमंदिरांमध्ये कीर्तन सप्ताहांचे आयोजन केलेले असते. श्रावणी सोमवारी हमखास या शिवमंदिरांमधून कीर्तने होतात. 'हरी हरा भेद काही करू नका वाद` ही संतांची धारणा आहे. ' शीव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या माथी` असे संतांनी म्हटले आहे. श्रावणात वारकरी कीर्तन आणि हरदासी कीर्तन हमखास ऐकायला मिळाले इतकेच नव्हे तर पांडवप्रताप, शिवलीलामृत, नवनाथ, हरिविजय, जैमिनी अश्वमेध, काशीखंड आदी ग्रंथांचे वाचनाही घरोघरी होते. या ग्रंथांच्या वाचनाला 'पोथी लावणे` 'पोथी सांगणेे` असे म्हणतात. एकेका ओवीचे वाचन करून त्या ओवीचा अर्थ एखादा कथेकरी बुवा सांगतो. हा अर्थ सांगताना तो प्रारंभी 'हां मग काय झालं महाराजा` अशी सुरवात करून पोथीतील कथेकडे सातत्याने श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतो. या पोथी वाचनात आणि पोथीच्या निरूपणात विशिष्ट प्रकारची लय असते. जसा कथेतील प्रसंग तशी ही लय कमी जास्त होते. थोडक्यात ही लय रसानुवर्ती असते. पोथीतील कथेत युध्दाचे वर्णन येते तेंव्हा पोथी वाचणारा आणि निरूपण करणारा यांची लय द्रूत असते. युध्दाच्या वर्णनात अस्त्रांचा उल्लेख येतो तेव्हा निरूपण करणारा अतिशय दूत लयीत वर्णन करतो ते असे, 'कर्णाने अग्नी अस्त्र टाकल्यावर अर्जुन त्यावर पर्जन्य अस्त्र टाकतो. अर्जुनाच्या पर्जन्य अस्त्राला कर्ण वायु अस्त्राने उत्तर देतो. 'अस्त्रांची ही फेका-फेक सांगताना जणू कथेकरी संपूर्ण कुरूक्षेत्रच समोर उभे करतात. युध्दातील अस्त्रांची वर्णने, जंगलातील वृक्षराजींची वर्णन, श्वापदांची वर्णने यात एकाप्रकारची दूतलय असते. तमाश्यातील वगनाटयात अशी वर्णन येतात तेंव्हा त्यांना कटाव, खांडण्या असे म्हटले जाते. श्रावणात विविध पोथ्यांच्या वाचनातून श्रवणभक्तीचे पुण्य साध्य केले जाते.

स्त्रियांच्या कान-मन या पोथ्यांनी अक्षरश: श्रवणात न्हाऊन निघते मग त्यांच्या ओठी जी जनपद गीते श्रावणात असतात त्यात हमखास श्रावणबाळ आणि दशरथांची कथा असते. ती अशी....

सरावना सारखा । पुत्र दे रे देवराया ।
खांद्यावरी कावड । कशी नेतो लवलाया ।
सरवना सारखा । एक पुत्र दे रे देवा ।
हातामधी झारी । घेतो वनामधी धावा ।।


श्रावण आपल्या पत्नीच्या आहारी गेला नाही याच स्त्रियांना मोठ कौतुक असतं. त्या म्हणतात......

सरावन बाळा । तुझ्या खांद्यावरी कायी ।
माया बापाची कावड । काशीला नेतो बाई ।
सरावन बाळा काशी केली उन्हाळयात।
लागनां उनं वारा । मायबाप डोलत्यात।
सरावन बाळा । तुवा काशी केली कशी ।
लागनां उनं वारा । बायबाप राती मेली ।


असा श्रावण महिमा श्रावण महिन्यात अंगणातील फेरगीतांमधून सुरू असतो.

एकूणच श्रावण महिन्यात लोकसंस्कृती मोराच्या पिसार्‍या सारखी श्रावण सरी सोबत फुलून येते अन् या लोकसंस्कृतीतील कीर्तने, पोथ्या, जानपद गीतांमधून श्रवण भक्तीचे रंग उलगडू लागतात.