शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. श्रावण
Written By वेबदुनिया|

श्रावणी सोमवार

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

MHNEWS
आपल्याकडच्या बहुतेक संतकवींनी जी काव्यरचना केली ती इतकी प्रचंड आहे की एकेका संतकवीचा यथासांग, पूर्ण अभ्यास करु म्हटले तर उभा जन्म पुरणार नाही. श्रीज्ञानेश्वरमाऊली, एकनाथ, नामदेव, तुकाराम, श्रीसमर्थ असे आपले संतपंचक. ज्ञानेश्वरमाऊली हे या पंचकात अग्रस्थानाचे मानकरी. एकनाथ महाराजांची काव्यरचना विविध स्वरुपाची आणि खूप मोठय़ा प्रमाणात आहे. नामदेवांची रचना त्यामानाने थोडी असली तरी ती वेगळ्याआगळ्या ढंगांची आहे. तुकोबांचे प्रकाशित आणि प्रचलित अभंग आठ हजारांहून अधिक आहेत. शिवाय इतर अनेक ठिकाणी विखुरलेल्या तुकोबांच्या रचना आहेत त्या वेगळ्याच. समर्थांचा दासबोध विशेष प्रसिध्द असला, तरी स्फुटरचनासुध्दा फार मोठय़ा संख्येत आहेत. समर्थांनी लिहिलेल्या एकूण सत्याहत्तर आरत्या प्रसिध्द आहेत. विशेष म्हणजे श्रीमंगेश आणि श्रीशांतादुर्गा या गोमंतकातील प्रसिध्द देवस्थानांच्या आरत्याही समर्थांनी लिहिल्या आहेत. महंतांनी नेहमी फिरत असावे, असे समर्थांचे सांगणे असे. हिंडता शहाणे होतें असा समर्थांचा अभिप्राय असे आणि त्याप्रमाणेच समर्थांचे आचरणही असे, समर्थांनी आपल्या आयुष्यात एक हजाराहून अधिक गावांना भेटी दिल्याचा पुरावा उपलब्ध आहे. समर्थ गोव्यात गेले होते. असेही नमूद आहे. ज्याअर्थी मंगेशाची आणि शांतादुर्गेची आरती समर्थांनी रचली आहे, त्याअर्थी बहूधा समर्थ या दोन्ही ठिकाणी गेले असले पाहिजेत. समर्थांनी लिहिलेली मंगेशाची आरती
पुढीलप्रमाणे - उपमा नाही रुपीं, निर्गुण गुण रहिता । कैलासाहुनि मानस धरिला भजकार्थां ।। काशी आदि करुनि गणनाच्या तीर्थां । लिंगदेहें वससी भक्तिभावार्थां ।। जय देव जय देव जय अजिनांबर धारी । आरती तुज मंगेशा निर्गुण उपचारीं ।। गजचर्मपरिधान शशि धरिला शिरीं । जिंकुनि कंठी केली उत्तरी ।। जटाजूट वसे गंगासुंदरी । वाहन नंदी तुझे अर्धांगी गौरी ।। मंगलदायक तुझे शिवनाम घेतां । तक्षण भस्म होती तापत्रय व्यथा ।। अभिन्न भिन्न भाव दासाच्या चित्ता । चरणाविरहित न करी मज गौरीकांता ।। ही आरती संपूर्णपणे शंकराला उद्देशून आहे आणि त्या आरतीच्या धृपदात आरती तुज मंगेशा निर्गुण उपचारीं । असे म्हटले आहे. निर्गुण अशा शंकराला निर्गुण उपचाराने समर्थ पूजतात.
गोमंतकातील श्रीमंगेश हे देवस्थान फार प्रसिध्द आहे. एकदा शंकर आणि पार्वती सारीपाट खेळत असताना थट्टेने पार्वती शंकराला काही लागट बोलली. शीघ्रकोपी शिवशंकर तेवढय़ावरुन संतापले आणि गोव्यातील कुशस्थळी क्षेत्रात नदीच्या पाण्यात राहू लागले. पतिविरहाने व्याकूळ झालेली पार्वती शंकराचा शोध घेत तेथपर्यंत पोचली आणि शंकराची स्तुती, आळवणी करु लागली. आपल्यामागून शोध घेत पार्वती कुशस्थळी आलेली पाहून आनंदित झालेल्या शंकराला पार्वतीची आपणही थोटी थट्टा करावी, असे वाटले आणि ते वाघाचे रुप घेऊन पार्वतीसमोर प्रगट झाले. त्या वाघाला पाहताच पार्वती घाबरली. तिच्या तोंडून शब्दही नीट उमटेना. त्यामुळे मां गिरीश त्राही असे म्हणण्याऐवजी तिच्या तोंडून मांगीश त्राहि असे शब्द बाहेर पडले. शंकर प्रसन्न होऊन निजरुपात प्रगट झाले आणि पार्वतीने त्यांच्याकडे वर मागितला की, या क्षेत्री मांगीश याच नावाने भक्तींनी तुम्हाला ओळखावे. पुढे मांगीश चे मंगेश असे रुप रुढ झाले.
समर्थ रामदासस्वामींनी मंगेशाची आरती केली असेल हे फारसे कोणाला माहीत नसावे. त्यामुळेच या आरतीचे विशेष महत्त्व आहे. पहिल्या श्रावण सोमवारी आपण या आरतीच्या आधारे शिवस्वरुप मंगेशाचे स्मरण करुया.