शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: लंडन , शनिवार, 17 जून 2017 (11:22 IST)

हॉकी संघासमोर आज कॅनडाचे आव्हान

पहिल्या साखळी सामन्यात स्कॉटलंडचे आव्हान पिछाडीवरून मोडून काढणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघासमोर येथे सुरू असलेल्या हॉकी वर्ल्ड लीग स्पर्धेतील आज (शनिवार) होणाऱ्या दुसऱ्या गटसाखळी लढतीत कॅनडाचे आव्हान आहे. या सामन्यात विजय मिळवून ब गटातील आपले स्थान सुधारण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाला मिळाली आहे.
 
सहाव्या मानांकित भारतीय संघाने काल स्कॉटलंडवर 4-1 अशी मात करताना आपल्या आक्रमणात झालेली प्रगती दाखवून दिली होती. आता कॅनडाविरुद्ध सराव करून घेतानाच पुढच्या खडतर आव्हानांसाठी तयारी करण्याचीही संधी भारताला आहे. भारताच्या यानंतरच्या गटसाखळी लढती पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि चतुर्थ मानांकित व माजी जगज्जेत्या हॉलंडविरुद्ध होणार आहेत.
 
त्याआधी उद्या 11व्या मानांकित दुय्यम दर्जाच्या कॅनडाविरुद्ध आपल्या कॉम्बिनेशनची चाचणी घेण्याची संधी प्रशिक्षक रोलॅन्ट ओल्टमन्स यांना मिळणार आहे. स्कॉटलंडविरुद्ध भारताने संथ प्रारंभ केला होता आणि त्यामुळे पहिला गोल करण्याची संधी प्रतिस्पर्धी संघाला मिळाली होती. मध्यंतराला प्रशिक्षक रोलॅन्ट ओल्टमन्स यांनी खेळाडूंचा ब्रेनवॉश केल्यानंतर त्यांच्या खेळात लगेचच सुधारणा झाली आणि सलग चार गोल करीत भारताने हा सामना जिंकला. परंतु प्रत्येक वेळी पिछाडीवरून जिंकण्याची संधी भारताला मिळणार नाही.
 
उद्याच्या सामन्यातील विजयामुळे भारताचे उपान्त्यपूर्व फेरीतील स्थान जवळजवळ निश्‍चित होणार आहे. मात्र त्यासाठी कोठाजित सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांच्या बचावफळीला जागरूक राहावे लागेल. स्पर्धेतील पहिलीच लढत खेळणारा कॅनडा संघ भारताला चकित करण्यासाठी कसून प्रयत्न करेल.