शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके जाहिर

राज्य शासनाने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके जाहिर केले असून नाशिक जिल्ह्यातल्या तळेगाव रोही (चांदवड) रहिवासी रोईंगपटू दत्तु बबन भोकनळ यास बिजींग येथील 16 व्या एशियन चॅम्पीयनशिप 2015 चे रौप्यपदक प्राप्त केल्याने शासनाने 5 लाख रुपयांचे, नाशिकमधील अक्षय अष्टपुत्रे यास 13 व्या आशियाई ‍अजिंक्यपद नेमबाजीत कास्यपदक प्राप्त केल्याने 3 लाख रुपयांचे तर सिन्नर मधील प्रियंका घुमरे हिस पॅरा एशियन गेम्स 2014 ज्युडो स्पर्धेत कास्यपदक प्राप्त  केल्याने 1 लाख रुपयांचे पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे.
 
याबरोबरच राज्यातील 53 खेळाडूंना पदकनिहाय एकूण 5कोटी 24 लक्ष रुपये व त्यांचे 40 क्रीडा मार्गदर्शकांकरिता 66 लक्ष रुपये जाहिर केले आहेत. सदर रोख पारितोषिक या महिन्यात खेळाडूंचे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.
 
सन 2017 – 18 वर्षातील विविध अधिकृत आंतरराष्ट्रीय खेळांच्या अधिकृत संघटनांच्या वयोगटातील खेळाडुंनी प्रथम व्दितीय व तृतीय क्रमांकाचे प्राविण्य प्राप्त केल्यास रोख बक्षिस पारितोषिकासाठी अर्ज पाठवावे. त्यासाठी विहित नमुन्यातील परिपुर्ण अर्ज भरून, खेळाचे प्रमाणपत्र आणि संबंधित राज्य/राष्ट्रीय खेळ  संघटनेच्या शिफारसीसह संबंधित जिल्हयाचे  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत अथवा थेट  आयुक्त, क्रीडा संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे यांचेकडे सादर करण्याचे आवाहन आयुक्त, क्रिडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य ए.आर.माने  यांनी केले आहे.