ऑलिम्पिकमधील पराभवानंतर जातीवाचक शिवीगाळ, वंदना कटारियांच्या कुटुंबीयांचा आरोप
भारतीय महिला हॉकी टिममधील फॉरवर्ड खेळाडू वंदना कटारिया यांच्या कुटुंबीयांना कथितरित्या जातीवाचक शिवीगाळ केल्याचं प्रकरण समोर आलंय.
बुधवारी ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकीच्या सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाने भारतीय संघाचा पराभव केला.
या सामन्यानंतर उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील रोशनाबाद गावात वंदना यांच्या घराबाहेर कथितरित्या दोघांनी जातीवाचक अपशब्द वापरले.
घरासमोर जातीवाचक शिवीगाळ करत फटाके फोडण्यात आल्याचं वंदना यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
वंदनाचे भाऊ शेखर यांनी टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं, "पराभवामुळे आम्ही दुःखी होतो. तेवढ्यात अचानक घराबाहेर फटाखे फोडण्याचा आवाज ऐकू आला. आम्ही बाहेर येऊन बघितलं तर आमच्याच गावातले दोघे होते. आम्ही त्यांना ओळखतो आणि ते वरच्या जातीचे आहेत. ते आमच्या घराबाहेर नाचत होते. जातीवाचक शिवीगाळ करत होते. आमच्या कुटुंबाचा अपमान करत होते. इतकंच नाही तर भारतीय महिला टीममध्ये अनेक खेळाडू दलित असल्यामुळे भारत हरल्याचं म्हणत होते."
या प्रकरणी एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून एकाला अटक केल्याची माहिती बीबीसीचे सहकारी पत्रकार ध्रुव मिश्रा यांनी दिली.