लाल मातीचा सम्राट नदाल फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत विजेता
लाल मातीवर आपणच सम्राट आहोत याचा प्रत्यय घडवित रॅफेल नदाल याने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत बाराव्या विजेतेपदावर मोहोर चढविली. त्याने उत्कंठापूर्ण लढतीत ऑस्ट्रियन खेळाडू डॉमिनिक थिम याला 6-3, 5-7, 6-1, 6-1 असे पराभूत केले. हा सामना तीन तास चालला.
विजेतेपदासाठी नदाल याचे पारडे जड होते. त्याने उपांत्य फेरीत रॉजर फेडरर या तुल्यबळ खेळाडूचा सरळ तीन सेट्समध्ये धुव्वा उडविला होता. थिम याने अंतिम फेरीत स्थान मिळविताना अग्रमानांकित नोवाक जोकोव्हिच याला गारद केले होते. अंतिम सामन्यातील दुसऱ्या सेटचा अपवाद वगळता या लढतीत नदाल यानेच वर्चस्व राखले होते.