अफवांचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही - विद्या
परिणितानंतर विद्या बालनला मागे वळून पहायची गरजच पडली नाही. एक चांगली अभिनेत्री अशी ओळख तिने अल्पावधीच प्रस्थापित केली आहे. एकलव्य, लगे रहो मुन्नाभाई, हे बेबी, भूलभुलैया यासारखे चित्रपट तिच्या खात्यात जमा आहेत. 11 जानेवारीला विद्याचा हल्लाबोल हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्या संदर्भात तिची घेतलेली खास मुलाखत... हल्लाबोलमध्ये काय भूमिका आहे? यात माझी लहान पण महत्त्वाची भूमिका आहे. मी अजय देवगणची पत्नी असून ती त्याच्या सुख-दुःखात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी रहाते. सुपरस्टारची पत्नी असूनही ती एक साधारण व्यक्ती आहे. दिग्दर्शक राजकुमार संतोषी बरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? राज सर अतिशय हसतमुख असे व्यक्तिमत्त्व आहे. इतिहास व वर्तमानावर त्यांची चांगली पकड आहे. त्यांना जे हवे आहे ते कलाकारांकडून व्यवस्थित काढून घेणे त्यांना जमते. दिग्दर्शकाच्या रूपात त्यांची नजर स्पष्ट असते. त्यामुळे त्यांना काय व कसे काम हवे आहे हे कलाकाराच्या लगेच लक्षात येते. अजयबरोबरचा हा पहिलाच चित्रपट. कलावंत व व्यक्ती म्हणून तो कसा वाटला? अजय एक नैसर्गिक कलाकार असून अतिशय आनंदात जगणारा प्राणी आहे.
कमी वेळेतच तू बरेच काही मिळवले आहेस. सगळी ईश्वराची कृपा आहे. मी करियरच्या सुरूवातीला चांगले चित्रपट निवडले. आज मी चित्रपट निवडताना सगळ्या गोष्टींकडे लक्ष देते. चित्रपटसृष्टीने मला पूर्णपणे स्वीकारले आहे. माझा येथील अनुभव खूप छान आहे. तुझे नाव सहकलाकारांशी जोडले जाते. या अफवांबद्दल तुला काय वाटते? सुरूवातीला मला राग यायचा. माझ्या वडिलांनी मला समजावले की या अफवादेखिल तुझ्या कामाचा भाग आहे. आता या अफवांचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. तू काम केलेल्या नायकांपैकी तुझा आवडता नायक कोणता? अक्षयकुमार सोबत काम करतांना मला मजा वाटली. शाहीद कपूरशीही माझे छान जमते. संजय दत्त चांगल्या स्वभावाचा आहे.