शाळा बंदचे अधिकार जिल्हाधिकार्यांना!
राज्यात वेगाने पसरत असलेल्या 'स्वाईन फ्लू'मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि आजाराचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग आणि वैद्यकीय अधिकार्यांच्या आज मुंबईत पार पडलेल्या बैठकीत शाळा किंवा महाविद्यालयात 'स्वाईन फ्लू'मुळे कोणी आजारी पडल्यास संबंधित शाळा अथवा महाविद्यालय बंद ठेवण्याचा अधिकार जिल्हाधिकार्यांकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक कोअर ग्रुप स्थापन करून राज्यातील 'स्वाईन फ्लू'च्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा निर्णयदेखील बैठकीत झाला. खासगी हॉस्पिटल आणि क्लिनिक यांना 'स्वाईन फ्लू'च्या रुग्णांवर उपचार करण्याचे अधिकार देण्यासाठी आगामी दोन दिवसांत निर्णय घ्यायचा, असेही बैठकीत ठरवण्यात आले.त्यासाठी लवकरच खासगी हॉस्पिटलच्या प्रतिनिधींशी सरकार चर्चा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. गर्दीच्या ठिकाणी संसर्गजन्य आजाराने ग्रस्त असलेल्यांनी जाऊ नये, प्रामुख्याने दहीहंडी आणि गणेशोत्सवासारख्या उत्सवापासून लांब राहावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केले. सोमवारी दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. स्वाइन फ्लूवर उपचार करण्यासाठी पुरेशी तयारी करण्यात आली आहे.